प्राथमिक शिक्षकांचा कलगीतुरा श्रेयासाठी!

ZP-Satara
ZP-Satara

सातारा - प्राथमिक शिक्षकांचे राजकारण जिल्ह्यास सर्वश्रुत आहे. प्राथमिक शिक्षक बॅंकेत झालेल्या उलथापालतीनंतर नोकरभरतीवरून आता आरोपांच्या फेरी झडल्या आहेत. तोपर्यंतच जिल्हा परिषदेत नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्षांना भेटून समस्या मांडल्या, त्या सोडविल्या, हे दाखविण्यासाठी शिक्षक संघ आणि समितीत कलगीतुरा सुरू आहे. 

प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेत ३७ कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीवरून चांगले घमासान सुरू आहे. प्रारंभी राजेश बोराटे, आनंदराव सोनवलकर, धनसिंग सोनावणे यांच्यासह काही शिक्षक सदस्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर बॅंकेचे माजी अध्यक्ष, शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील, अध्यक्ष चंद्रकांत यादव, सुभाष ढालपे यांनी पत्रकार परिषदेद्वारे भरती प्रक्रियेवर आरोप केला.

आता सत्ताधारी गटातील शिक्षक समितीचे नेते सावधानतेने पावले उचलत संघाच्या नेत्यांच्या भानगडी बाहेर काढण्याची व्यूहरचना आखत आहेत. याचदरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संजय भागवत रुजू झाले आहेत.

त्यामुळे प्रथम त्यांना भेटून समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, सरचिटणीस प्रदीप कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न मांडले. त्यानंतर तत्काळ संघाचे नेते बलवंत पाटील, चंद्रकांत यादव, शिक्षण समितीचे सदस्य नवनाथ भरगुडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना भेटून समस्या मांडल्या. 

शिक्षक बॅंकेत, शिक्षकांमध्ये वर्चस्व राहण्यासाठी संघ आणि समितीमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक वर्षे रखडलेली पदोन्नती प्रक्रिया, प्रलंबित रोष्टर, शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे, वैद्यकीय बिलांना मंजुरी मिळविणे यांसह विविध समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी अध्यक्ष, सीईओंकडून ग्वाहीही घेतली जात आहे. भविष्यात प्रशासकीय पातळीवर कार्यवाही, या समस्या सुटल्यानंतर आम्हीच प्रयत्न करून सोडविल्याचे श्रेय मिळविण्यासाठी संघ आणि समितीचा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही शिक्षकांतून होत आहे. शिवाय, ऑनलाइन बदली प्रक्रियेत याच संघटना पाठीशी न राहिल्याने दुखावलेला शिक्षक वर्ग स्वतंत्र विचार करून आता पुढे येऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com