पंढरपूर: विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या प्राचार्यांची आत्महत्या

अभय जोशी
रविवार, 21 मे 2017

या घटनेच्या संदर्भात या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना विचारले असता "सकाळ"शी बोलताना ते म्हणाले, प्राचार्य खडतरे यांचे कोणीही आमच्या महाविदयालयात शिकण्यास नाही. असे असताना ते आमच्या महाविद्यालयात का आले होते याची आम्हाला काहीही माहिती नाही.

पंढरपूर - सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप खडतरे (वय 56) यांनी विद्यार्थिनींची छेड काढल्यावरुन त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले होते. या प्रकरणानंतर आज (रविवार) खडतरे यांनी येथील गोपाळपूर मधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य खडतरे हे गेल्या दीड वर्षांपासून प्राचार्य म्हणून काम पहात होते. महाविद्यालयामधील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना 16 मे रोजी त्यांच्या वर्गात जाऊन 'तुम्ही मला का घाबरता, मला घाबरायचे नाही मी तुमचा मित्र असल्यासारखे आहे' असे म्हणून दोन विद्यार्थीनींचे गाल पकडून त्यांच्या अंगावरुन हात फिरवून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी पुन्हा वर्गात येऊन खडतरे त्या विद्यार्थीनींना तुम्ही असेच रोज सकाळी कॉलेजला या मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही मी बोलतो म्हणून लाजू नका. मी तुमच्या मित्रासारखा आहे तुम्हाला काही अडीअडचणी असल्या तरी सांगा. आपण फिरायला जाऊ असे म्हणाले होते. 18 मे रोजी त्या चार विद्यार्थीनी कॅन्टीन मध्ये नाश्‍त्यासाठी गेलेल्या असताना प्राचार्य खडतरे यांनी शिपाई सरफराज मुलाणी यांना कॅन्टीन मध्ये पाठवले व प्राचार्यानी बोलवले आहे असे सांगितले. त्यानंतर त्या विद्यार्थीनी प्राचार्यांच्या केबीन मध्ये गेल्यानंतर "तूम्ही मुलांच्या का नादी लागता ,तुमच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो" असे प्राचार्य खडतरे त्यांना म्हणाले होते.

प्राचार्यांच्या वारंवारच्या अशा बोलण्यानंतर विद्यार्थीनींनी प्राचार्यांचे बोलणे मोबाईल मध्ये रेकॉर्डींग केले व आपल्या नातेवाईकांना त्याबद्दल सांगितले. त्यानंतर विद्यार्थीनींच्या नातेवाईकांनी प्राचार्य खडतरे यांना कॉलेज मधून बाहेर काढून त्यांच्या तोंडाला काळे फासले व मारहाण केली होती. त्यावेळी प्राचार्यांच्या एका सहकारी शिक्षकाने प्राचार्य खडतरे यांना चार चाकी गाडीत बसवून तेथून घेऊन गेले होते. पिडीत विदयार्थीनींच्या नातेवाईकांनी प्राचार्य खडतरे व शिपाई सर्फराज मुलाणी याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन सांगोला पोलिसांनी त्यांच्या विरुध्द काल (ता.20) रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिपाई सर्फराज मुलाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते .

दरम्यान प्राचार्य खडतरे यांचा गोपाळपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसताना आज सकाळी नऊ च्या सुमारास ते या अभियांत्रिकी महाविद्यालयात आले आणि त्यांनी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. जोरदार आवाज होताच महाविद्यालयातील वॉचमन तसेच अन्य कर्मचारी तिकडे धावत गेले. गंभीर जखमी अवस्थेत पडलेली व्यक्ती प्राचार्य खडतरे असल्याचे त्यांच्या खिशातील कागदावरुन समजताच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात नेले परंतु त्यांच्यावर उपचार सुरु करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्‍टरांनी जाहीर केले.

या घटनेच्या संदर्भात या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना विचारले असता "सकाळ"शी बोलताना ते म्हणाले, प्राचार्य खडतरे यांचे कोणीही आमच्या महाविदयालयात शिकण्यास नाही. असे असताना ते आमच्या महाविद्यालयात का आले होते याची आम्हाला काहीही माहिती नाही.

गोपाळपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाशी प्राचार्य श्री.खडतरे यांचा कोणताही संबंध नसताना त्यांनी आत्महत्या करण्यासाठी ती जागा का निवडली , तसेच त्यांच्याकडील मोबाईल वरुन त्यांचे कोणाकोणाशी शेवटी बोलणे झाले होते. याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Principal suicide in Pandharpur