कमी दरामुळे ‘या’ व्यवसायाला ग्रहण लागण्याची भीती

श्रीनिवास दुध्याल
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पारंपरिक मुद्रण यंत्रणा कालबाह्य झाली असून त्यात मोठे आधुनिकीकरण झाले आहे. वाढती व्याप्ती व आधुनिकतेमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सोलापूर मेडिकल हब होत असून, मेडिकल क्षेत्रातील सर्वच प्रिंटिंगची कामे सोलापुरातील आधुनिक मशिनरींवर साध्य झाली आहेत.

सोलापूर : पूर्वी येथील चादर-टॉवेलचे लेबल, कॅलेंडर व अन्य फोर कलर प्रिंटिंगसाठी शिवकाशी, पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबून राहावे लागत असे. आज सोलापुरातील प्रिंटिंग क्षेत्रातील आधुनिक व महागड्या मशिनरी, उच्च दर्जा, हव्या त्या डिझाईनमध्ये शिवकाशी, पुणे, मुंबईच्या तोडीची सुंदर छपाई होत असल्याने पुणे, मुंबई यासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील छपाईची कामे सोलापुरात होत आहेत. मात्र, प्रिंटिंग व्यावसायिकांतील "त्याच्यापेक्षा कमी दरात प्रिंटिंग करून देतो' अशा जीवघेण्या स्पर्धेमुळे प्रिंटिंग हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरतो आहे.

हेही वाचा : आवड कोणतीही असो इतरांना सांगा! कारण...

दरांची अस्वस्थ करणारी स्पर्धा
पारंपरिक मुद्रण यंत्रणा कालबाह्य झाली असून त्यात मोठे आधुनिकीकरण झाले आहे. वाढती व्याप्ती व आधुनिकतेमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सोलापूर मेडिकल हब होत असून, मेडिकल क्षेत्रातील सर्वच प्रिंटिंगची कामे सोलापुरातील आधुनिक मशिनरींवर साध्य झाली आहेत. मात्र, 2015 पासून सोशल मीडिया फोफावल्याने, पेपरलेस कामांमुळे तसेच परराज्यांतील कामे आपल्याकडे वळवण्याच्या नादात दरांची अस्वस्थ करणारी स्पर्धा वाढली आहे. यामुळे जवळपास 50 टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. दीड ते दोन कोटींच्या मशिनरींवरसुद्धा किरकोळ दरात कामे होत असल्याने व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे मत प्रिंटिंग व्यावसायिकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. तर काही व्यावसायिकांनी दर्जा व सेवेला प्रमाण मानल्याने त्यांच्याकडे मोठ्या कंपन्यांची कायमस्वरूपी मोठी कामे सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा : तुम्हालाही आठवेल चहाच्या टपरीवरील चर्चा
ठळक

  • आधुनिक ऑफसेट, डिजिटल, गोल्ड फॉयलिंग, एम्बॉसिंग, ऑटोमॅटिक कटिंग व बायंडिंग मशिन
  • अडीच लाख ते दोन कोटी रुपयांच्या मशिनरी
  • कामगारांचे कमी वेतन, कष्टाळू व कलात्मक बुद्धिमत्तेमुळे देशभरातून मिळताहेत कामे
  • वाढत्या व्यावसायिकांमुळे 2015 पासून दरांची सुरू झाली स्पर्धा
  • पेपर, डीटीपी, प्रिंटिंग, बायंडिंग अशा स्वतंत्र व्यावसायिकांनी थेट प्रिंटिंगची कामे घेण्यास केली सुरवात
  • एकमेकांची कामे ओढण्यामुळे केवळ व्यवसाय टिकावा म्हणून किरकोळ दरात केली जाताहेत कामे
  • पुणे-मुंबईच्या मानाने 30 ते 40 टक्के कमी दर
  • 200 प्रिंटिंग व्यावसायिक मात्र मुद्रक असोसिएशनचे केवळ 60 ते 70 सभासद
  • दर नियंत्रणासाठीच्या बैठकीत मिळत नाही व्यावसायिकांचा प्रतिसाद

हेही वाचा : तुझे पैसे जमिनीवर पडले आहेत उचलून घे..
अन्य व्यवसायिकांवर परिणाम

आमच्याकडे आधुनिक मशिनरींवर प्रिंटिंगची कामे होत असल्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांतील मोठ्या कंपन्यांची प्रिंटिंगची कामे असतात. सोलापुरात दरांच्या तीव्र स्पर्धांचा परिणाम आमच्यावर झालेला नाही. मात्र, शहरातील अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुद्रक संघाच्या बैठका घेतल्या जातात. मात्र, व्यावसायिक उपस्थित नसतात.
- महेंद्र बाकळे, अध्यक्ष, सोलापूर मुद्रक संघ
-
५० टक्के दर कमी
गेल्या 45 वर्षांपासून प्रिंटिंग क्षेत्रात आहे. आता आधुनिक मशिनरींवर दर्जेदार कामे होत आहेत. मात्र, प्रिंटिंग हबच्या दिशेने जाणाऱ्या सोलापूरला अनियंत्रित तीव्र अंतर्गत स्पर्धेमुळे या व्यवसायाला ग्रहण लागत असल्याची भीती वाटते. रॉकेल मिळत नाही, अन्य साहित्य महागले, मात्र प्रिंटिंगचे दर अन्य शहरांच्या मानाने 50 टक्के कमी आहेत. याचा फटका बसत असूनही नाइलाजाने व्यवसाय सुरू आहे.
- अनिल देवनपल्ली, खजिनदार, सोलापूर मुद्रक संघ
-

येथील व्यवसायिकांकडून कमी दर
प्लास्टिक बंदीनंतर आमच्या कागदी पेपर बॅग उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कागदी बॅगवर ऑफसेट व स्क्रीन तर कापडी बॅगवर स्क्रीन प्रिंटिंगची गरज असते. मात्र, येथील प्रिंटिंग व्यवसायातील कष्ट व उत्तम दर्जाच्या तुलनेने अन्य शहरांपेक्षाही येथील व्यावसायिक कमी दर घेत आहेत. त्यात आमचा फायदा होत आहे. मात्र, मनाने खूप वाईट वाटते. ही स्पर्धा त्यांना खूपच नुकसानकारक ठरणारी आहे.
- कृष्णा कोतलापुरे, पेपर बॅग उत्पादक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Printing work in Karnataka is in Solapur