...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण

कॉंग्रेसच्या मेळाव्यात युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आगामी काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी युवक कॉंग्रेसने सुपर 30 फॉर्म्युला तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : भाजप सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून, सर्वाधिक बेरोजगारी, महागाई वाढली आहे. सरकारी कंपन्या विकून भाजप देश चालवित आहे. आता त्यांचे पितळ उघडे पडले असून, हे सरकार पुढे राहिले तर युवकांचे भवितव्य अंधारे होईल. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपचे सरकार घालविण्याची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी लागेल, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
 
कॉंग्रेस भवनात कार्यकर्ता मेळावा आणि नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सत्कार कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. त्या वेळी कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, पृथ्वीराज पाटील (सांगली), महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, हिंदूराव पाटील, एनएसयुआचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
श्री. चव्हाण म्हणाले, ""जिल्हाध्यक्ष निवडताना पक्षासाठी वेळ देणारा कार्यकर्ता किमान कॉंग्रेस भवनात बसला पाहिजे. हा मुद्दा लक्षात ठेऊन आम्ही डॉ. सुरेश जाधव यांची निवड केली. आता लवकरच कार्यकारिणी तयार करूया, तसेच प्रत्येक महिन्याला पक्षाची एक बैठक झाली पाहिजे. त्यासोबतच एक व्याख्यानही कॉंग्रेस भवनात झाले पाहिजे. त्यातूनच पक्ष बळकट होणार आहे.'' 
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मी स्वत: प्रयत्न केला; पण मागील पाच वर्षांत फडणवीस सरकारने त्याचा साधा पाठपुरावा केला नाही. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मी आघाडी सरकारच्या काळात घेतला, तसेच मुस्लिम समाजाला मागासवर्गीय यांना पाच टक्के आरक्षण दिले; पण मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली, तर मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचा आदेश न्यायालयाने दिला; पण फडणवीस सरकारला घाम फुटला. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार पुन्हा निर्णय घेऊन आरक्षण देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून, सर्वात जास्त बेरोजगारी, महागाई वाढली आहे. सहा वर्षांत जीएसटी कराची रक्कम महाराष्ट्राला मिळालेली नाही. उलट भाजप सरकारी कंपन्या विकून चालवित आहे. आता त्यांचे पितळ उघडे पडले असून, हे सरकार पुढे राहिले तर युवकांचे भवितव्य अंधारमय होईल. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपचे सरकार घालविण्याची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी लागेल. त्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही डॉ. सुरेश जाधव यांच्यासारख्या निष्ठावंतांवर दिली आहे.'' 

जरुर वाचा : आता खुले मतदानच घ्या

ऍड. कणसे म्हणाले, ""सर्व सेल व विभागांनी त्यांना साथ दिली, तर जिल्हाध्यक्ष काहीतरी करतील; पण बाबांच्या भोवती कोंडाळे करून चालणार नाही. रिसल्ट ओरिएंटेड काम झाले पाहिजे.'' 
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ""मी एकटाच नव्हे तर इच्छुक असलेले आपण सर्व जण जिल्हाध्यक्ष असल्याप्रमाणे वाटचाल करूया. कार्यकर्त्यांत आत्मविश्वास भरण्याचे काम केले जाणार आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला विचारल्याशिवाय जिल्ह्यात निर्णय होणार नाही.'' 
पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्याची कन्या अश्विनी पाटील यांना चीनमधून यशस्वीपणे परत आणल्याबद्दल चव्हाण यांचे धनश्री महाडिक यांनी अभिनंदन केले. या वेळी पृथ्वीराज पाटील, प्रताप देशमुख, मनोज तपासे, जितेंद्र भोसले आदींची भाषणे झाली. प्रारंभी दत्तात्रेय धनावडे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. या वेळी प्रताप देशमुख, झाकीर पठाण, अविनाश फाळके, निवास थोरात, अजित पाटील चिखलीकर, अन्वर पाशा खान, मनोज तपासे, रोहिणी निंबाळकर, रजिया शेख, प्रल्हाद कदम, दयानंद भोसले, साहेबराव जाधव, विजयाताई बागल, बाळासाहेब बागवान, किरण बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बाबूराव शिंदे स्वागत व प्रास्ताविक केले. नरेश देसाई यांनी आभार मानले. 

जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा : विराज शिंदे

कॉंग्रेसच्या आजच्या मेळाव्यात युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आगामी काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी युवक कॉंग्रेसने सुपर 30 फॉर्म्युला तयार केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये जिल्हा परिषदेचे 30 मतदारसंघ घेतले आहेत. तेथील बूथनिहाय नियोजन केले आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेस वाटचाल करत आहे. हा सुपर 30 चा फॉर्म्युला आम्ही राबवित आहोत. त्यासोबतच युवा जोडो अभियान सुरू करत आहोत. यामध्ये नवीन युवकांना पक्षात घेऊन त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले जाईल. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भाषणात जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा फडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

वाचा : आईच्या पार्थिवाला ज्येष्ठ मुलीने दिला भडाग्नी

हेही वाचा : मोदी, शहांमुळेच दिल्लीत दंगल; पृथ्वीराज चव्हाणांचा घणघणात

Web Title: Prithviraj Chavan Speech Devendra Fadnvis Satara District Congress Melava

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraBjp
go to top