esakal | आता बस्स! सांगलीत पृथ्वीराज पवार यांचा जयंत पाटील यांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

आता बस्स!  सांगलीत पृथ्वीराज पवार यांचा जयंत पाटील यांना इशारा

आता बस्स! सांगलीत पृथ्वीराज पवार यांचा जयंत पाटील यांना इशारा

sakal_logo
By
अजित झळके

सांगली: जिल्ह्यात कोरोनाचे संकट मोठे आहे, हे मान्यच; मात्र त्यासाठी सांगलीची बाजारपेठ उद्‍ध्वस्त होत असताना आम्ही बघत बसणार नाही. पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांचा सांगलीवरील राग आम्हाला मान्य आहे, मात्र या काळात त्यांनी तो बाजूला ठेवावा आणि नियमांचे पालन करून व्यापार सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी भाजप नेते, सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार(prithviraj pawar) यांनी आज येथे केली.(prithviraj-pawar-criticism-on-jayant-patil-human-chain-movement-sangli-marathi-news)

सातत्याने वाढत निघालेला लॉकडाऊन कुठेतरी थांबवा; व्यापारी, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, फूल विक्रेते, फळ विक्रेते या घटकांना जगू द्या, अशी मागणी करत शहरातील कापडपेठ, गणपती पेठ, मारुती रस्ता येथील व्यापाऱ्यांनी मानवी साखळी केली. सुरक्षित अंतर ठेवून, हातात फलक घेऊन राज्य सरकारला साकडे घालण्यात आले. पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बारा ते साडेबारा या वेळेत पेठेत बघेल तिकडे फलक घेतलेले लोक दिसत होते. रिक्षावाले, चहावाले, मोठे शोरुमवालेही फलक घेवून उभे होते. लॉकडाऊन काळातील सर्व कर्जाचे व्याज माफ करावे, प्रोत्साहन अनुदान द्यावे, महापुरात मिळाली त्याप्रमाणे मदत मिळावी, महापालिका व पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम परत मिळावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना राज्यातील प्रमुख मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक घेण्यास विरोध करायला हवा होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वाळवा, कडेगाव परिसरात कोरोनाचा स्फोट झाला. वाळवा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज सरासरी चारशेने वाढत असताना त्यांनी तालुक्यात तळ ठोकणे गरजेचे होते. त्याऐवजी ते मराठवाड्याचा दौरा करून पक्ष वाढीचा कार्यक्रम राबवत राहिले.

इकडे कोरोनाने आपला विस्तार साधून घेतला. वाळवा तालुक्यातील संख्या जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या जवळपास 40 ते 45 टक्के आहे. समस्या वाळव्यात मोठी आहे, महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या कमी आहे, मग इथे बंद कशासाठी? सांगली, मिरज शहरांसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देणे आवश्यक होते. कोरोना संबंधीच्या उपाय योजना किंवा लॉकडाऊन हे कोणत्याही कायद्यानुसार राबवले जात नसून तो तारतम्याचा आणि सद्‍सदविवेकबुद्धीचा भाग आहे. त्यामुळे मंत्री म्हणून हा निर्णय शक्य आहे. त्यात तांत्रिक अडचण असण्याचे काहीच कारण नाही.’’

हेही वाचा- घराचं स्वप्न महागलं; 'क्रेडाई'च्या अभ्यासात आला नवा निष्कर्ष समोर!

ते म्हणाले, सांगली आणि मिरज हे पेठांचे शहर म्हणून ओळखले जाते. इथल्या पेठा बंद राहिल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. सन २०१९ च्या महापूरात सगळी यंत्रणा कोलमडून पडेपर्यंत प्रशासन सुस्त होते. आज कोरोना संकटात बाजारपेठ कोलमडून पडली आहे. व्यापारी, हातगाडीवाले, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी फास लावून घेतल्यानंतरच आपले डोळे उघडणार आहेत का? जयंत पाटील सांगलीचे पालकमंत्री झाल्याने त्यांची दीर्घकाळाची स्वप्नपूर्ती आहे, मात्र इथल्या लोकांची स्वप्ने धुळीला मिळताना दिसत आहे. त्यांनी सांगलीचे पालक म्हणून वागावे. त्यांच्या मनात सांगलीकरांनी विषयी काही राग असेल द्वेष असेल तर तो या संकट काळापुरता बाजूला ठेवावा आणि सहानुभूतीने विचार करावा.’’यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, भारती दिगडे, सुब्रावर मद्रासी, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक शिवराज बोळाज, सतीश साखळकर, रामचंद्र देशपांडे, रेखा पाटील आदी उपस्थित होते.

loading image