पैसे नाहीत? मग बेड "फुल्ल'... कुठे चाललाय बाजार वाचा

शांताराम पाटील
Wednesday, 9 September 2020

वाळवा तालुक्‍यात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बहुतांश रुग्णालयांत रुग्ण दाखल करताना 20 हजारांपासून 60 ते 70 हजार रुपयांची बिदागी हातावर ठेवल्याशिवाय रुग्णावर कोविड उपचार सुरू होत नाहीत.

इस्लामपूर  (जि. सांगली) : वाळवा तालुक्‍यात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी खासगी व शासकीय रुग्णालयांत एकूण 327 बेड उपलब्ध करण्यात आल्याचे प्रशासन छातीठोकपणे सांगते; मात्र यातील कोणत्याही रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी फोन केला असता "बेड फुल' असल्याची माहिती संबंधित रुग्णालयातून देण्यात येते. बहुतांश रुग्णालयांत रुग्ण दाखल करताना 20 हजारांपासून 60 ते 70 हजार रुपयांची बिदागी हातावर ठेवल्याशिवाय रुग्णावर कोविड उपचार सुरू होत नाहीत. या प्रकारामुळे सर्वसामान्य लोक मेटाकुटीला आले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग आता समूह पद्धतीने सुरू झाल्याने शहरी भागासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. तालुक्‍यात 476 बेड कोविडबाधित लोकांना उपचारासाठी उपलब्ध आहेत, असा शासकीय आकडा आहे. मात्र उपचारासाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये फोन केल्यास बेड फुल आहेत, असा निरोप मिळतोय. बहुतांश रुग्णालयांच्या कोविड ओपीडीवर फेरफटका मारला असता, कोविड बाधीत प्रमाणपत्र असूनही रुग्णांना 20 ते 60 हजारांपर्यंत आगाऊ रक्कम भरावी लागेल असे सांगितले जाते. ज्या रुग्णाकडे पैसे नाहीत त्यांना ऍडमिट करुन घेतले जात नाही. शासन व काही रुग्णालये आमच्याकडे कोविडबाधित उपचारासाठी मोफत महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू असल्याचे सांगतात.

रुग्णांच्या नातेवाईकांकडून केसपेपर करतानाच 20 ते 60 हजारापर्यंतचे पैसे भरण्याची परिस्थिती आहे का नाही, हे पाहून पैसे घेत त्यांना प्रवेश दिला जातो. याबरोबरच रेशनकार्ड, आधार कार्ड व कोविडबाधित प्रमाणपत्र मागितले जाते. पैसे घेतात, मग महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी लागणारी कागदपत्रेही का मागितली जातात हा प्रश्‍न रुग्णांच्या नातेवाईकांना पडत आहे. काहीवेळा रुग्ण दाखल केल्यानंतर एक ते दोन दिवसात दगावण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. त्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून 60 ते 70 हजार रुपये भरुन घेऊन मगच मृतदेह स्मशानभूमीकडे रवाना केला जातो. 

हा भयानक प्रकार सध्या वाळवा तालुक्‍यात सुरू आहे. प्रशासनात एकवाक्‍यता व सुसूत्रता नसल्याने रुग्णांची लूटच होत आहे. कोविडबाधित रुग्णांना उपचारासाठी संपर्क साधण्यासाठी दिलेले नंबर संबंधित लोक उचलत नाहीत, असाही अनुभव आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेशी व महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रत्येक जण "ही जबाबदारी आमची नाही' असे म्हणून टाळाटाळ करतात. प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेत समन्वय साधून रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळण्यासाठी सेंट्रल कक्ष करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

वाळवा तालुक्‍यातील उपलब्ध कोविड बेड 

  • इस्लामपूर 
  • उपजिल्हा रुग्णालय - 105 (30 ऑक्‍सिजनसह व 5 व्हेंटिलेटर) 
  • खासगी रुग्णालये - 207 (192 ऑक्‍सिजनसह) 
  • आष्टा 
  • खासगी रुग्णालये - 15 (सर्व ऑक्‍सिजनसह)

हॉस्पिटलवर कारवाई अपेक्षित

कोविड उपचार या प्रक्रियेत प्रशासनाचा कसलाच वचक व समन्वय राहिलेला नाही. प्रशासनाने सांगूनही बहुतांश रुग्णालयांत उपचारासाठी अगोदर डिपॉझिट भरून घेतले जाते. वाळवा तालुक्‍यासाठी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर शून्य माहिती मिळते. जबाबदारी असलेले लोक हात वर करत आहेत. भरमसाठ पैसे घेणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई होणे अपेक्षित आहे. 
- शाकीर तांबोळी, बहुजन विकास वंचित आघाडी 

आमच्याशी संपर्क साधावा

ज्या ठिकाणी भरमसाठ पैसे आकारले जात आहेत किंवा पैशासाठी उपचार करण्यास नकार देत आहेत त्यांच्या विरोधात आमच्याशी संपर्क साधावा. कारवाई करू. 
- नागेश पाटील, प्रांताधिकारी 

संपादन- युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospitals over charging to Corona patient in Valawa taluka