खासगी बुद्धिमत्ता चाचणीस सहकार्य केल्यास कारवाई 

सुधाकर काशीद - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कोल्हापूर - कोणत्याही खासगी संस्थेने घेतलेल्या बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहकार्य केल्यास, त्या शिक्षकाला कठोर कारवाईस तोंड द्यावे लागेल, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुभाष चौगुले यांनी आज स्पष्ट केले. ते म्हणाले, ""शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेशिवाय इतर कोणत्याही खासगी संस्थेने घेतलेल्या परीक्षेस कसलीही शासकीय मान्यता नाही. त्यातील मुलांच्या गुणवत्ता यादीसही शासनमान्यता नाही किंवा असल्या परीक्षांना जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने, शिक्षकाने मदत केल्यास तो शिस्तभंगाचा गुन्हा ठरू शकतो. प्रत्येक शाळेला या संदर्भातले परिपत्रक पाठवले आहे.'' 

दरम्यान, आज काही शिक्षकांनीच "सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार खासगी संस्थांकडून वेगवेगळ्या नावाखाली परीक्षा घेतल्या जात आहेत; मात्र त्यासाठी या संस्था अप्रत्यक्षपणे शाळांचा व काही शिक्षकांचा आधार घेत आहेत. या परीक्षांचे महत्त्व पालकांना पटवून देणे, या परीक्षेला मुलगा बसला नाही तर तो अभ्यासात कच्चा राहील, अशी भीती घालून हे काही शिक्षक मुलांच्या पालकांना गोंधळून टाकतात. पालकालाही पूर्ण माहिती नसल्याने तो अशा परीक्षांना आपल्या मुलांना बसवतो. या परीक्षांची फी, परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुस्तके याचा मोठा खर्च आहे. तो पालकाला करावा लागतो. याशिवाय शाळेचा नियमित अभ्यास व त्याबरोबरच या खासगी परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर पडतो. विशेष हे की या परीक्षा शाळांच्या सुटीदिवशीच ठेवल्या जातात. मुलांना सुटीदिवसी खेळण्या-बागडण्याऐवजी अनावश्‍यक भीती घालून पालक या परीक्षांना बसवतात. काही पालक तर परीक्षा संपेपर्यंत शालेच्या दारात बसून राहतात. स्वतःही या परीक्षेच्या दडपणाखाली राहतात व मुलांनाही दडपणाखाली ठेवतात. 

वास्तविक शिष्यवृत्ती परीक्षा हीच मुलांच्या गुणवत्तेसाठी चांगली परीक्षा आहे. या परीक्षेने दर्जाही राखला आहे. या परीक्षेचा अभ्यास मुलांना नियमितपणे थोडासा जादा वेळ देऊन करता येतो. ही परीक्षा वर्षातून एकदाच असते; पण खासगी परीक्षा घेणाऱ्या संस्था वेगवेगळ्या आहेत. आपलीच परीक्षा किती दर्जेदार आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्रतिनिधी नेमले आहेत. वैयक्तिक पातळीवर एखादा विद्यार्थी खासगी परीक्षा देऊ शकतो; पण या खासगी परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी काही शाळा, काही मुख्याध्यापक, काही शिक्षकांना हाताशी धरले आहे व ते परीक्षेसाठी विद्यार्थी गोळा करण्याचे काम करत आहेत. या परीक्षेसाठी फी असून, या परीक्षेची पुस्तके वेगळी आहेत. ही पुस्तके पालकांच्या गळ्यात मारली जात आहेत. या मागे मोठी आर्थिक साखळी आहे. शिक्षणाच्या स्पर्धेत गोंधळून गेलेल्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा त्यांनी फायदा घेतला आहे. 

काही शिक्षकांकडून प्रचार 
या परीक्षा शाळांतच घेतल्या जातात. त्यानिमित्ताने शाळा भाडे आकारतात. सुपरवायझर म्हणून काही शिक्षक काम करून भत्ता घेतात. परीक्षेसाठी मुले मिळवून दिल्याबद्दल, पुस्तके खपवल्याबद्दल कमिशन घेतात. अर्थात सर्व शिक्षकांचा यात सहभाग नाही; पण काही मुख्याध्यापक, काही शिक्षकांचा यात पूर्ण सहभाग आहे किंवा तेच या परीक्षांचा प्रचार करत आहेत. 

Web Title: Private intelligence test