वाढीव तलाठी सज्जांना लागेना मुहूर्त 

तात्या लांडगे 
शनिवार, 21 जुलै 2018

सोलापूर : राज्यात तीन हजार 165 वाढीव सज्जे व 528 महसूल मंडळांना मंत्रिमंडळाने वर्षभरापूर्वी मान्यता दिली. त्यानंतर विभागीय आयुक्‍तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शासनाला सादर केला. परंतु, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आली.

पुणे विभागासाठी 463 वाढीव तलाठी सज्जे आणि 77 महसूल मंडळांची निर्मिती होणे अपेक्षित आहे, मात्र त्याबाबत शासनाकडून हालचाली ठप्पच आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमधील बहुतांशी महसूल मंडळात सात-बारा उताऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्याठिकाणी आणखी तलाठ्यांची गरज आहे. त्यासाठी वाढीव तलाठी सज्जे व महसूल मंडळांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने वर्षापूर्वी घेतला. त्याला अद्यापही मूर्त स्वरूप आलेले नाही. त्यामुळे संगणकीकृत सात-बारा दुरुस्तीसाठी विलंब लागत असून 1 ऑगस्टपासून खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा उतारा मिळण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यासाठी 111 तलाठी सज्जे आवश्‍यक
सोलापूर जिल्ह्यातील उताऱ्यांची संख्या दहा लाख 73 हजार 45 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात 535 तलाठी सज्जे व 91 महसूल मंडळे असून आणखी 111 तलाठी सज्जे व 19 महसूल मंडळांची गरज आहे. त्यानुसार जानेवारी 2018 रोजी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केला असून त्यावर निर्णय झालेला नाही. उताऱ्यांची संख्या अधिक असल्याने काही तलाठ्यांवर कामाचा अतिरिक्‍त ताण पडत असून वाढीव सज्जानंतर तो कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

Web Title: problem faced in talathi recruitment