esakal | अखेर महाराष्ट्र-कर्नाटक पाणी प्रस्ताव तयार ; डिसेंबरला होणार बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

the problem of water supply of karnataka and maharashtra the proposal ready meeting on december in kolhapur

मंजुरीसाठी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक पाटबंधारे विभागाची बैठक होणार आहे.

अखेर महाराष्ट्र-कर्नाटक पाणी प्रस्ताव तयार ; डिसेंबरला होणार बैठक

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : २०२०-२१ साठी महाराष्ट्र-कर्नाटक पाणी वाटप कार्यक्रमाचा प्रस्ताव कर्नाटक पाटबंधारे खात्याने तयार केला आहे. महाराष्ट्रातील लघुपाटबंधारे विभागाकडे सहीसाठी प्रस्ताव पाठविला. त्याच्या मंजुरीसाठी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक पाटबंधारे विभागाची बैठक होणार आहे.

पावसाळ्यानंतर प्रतिवर्षी नोव्हेंबर-मे या सात महिन्यांच्या काळात महाराष्ट्रातील काळम्मावाडी धरणातून कर्नाटकला दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या करारानुसार पाणी वाटप केले जाते. वेदगंगा, दूधगंगा काठावरील शेतीला हे पाणी उपयुक्त ठरते. दरवर्षी चार टीएमसी पाणी महाराष्ट्राने कर्नाटकला देण्याचा करार आहे. त्यापैकी बाष्पीभवन, पात्रात पाणी झिरपणे, गळती व अन्य तूट जाता ३.२८ टीएमसी पाणी प्रत्यक्षात वापरण्यासाठी मिळते. चार टीएमसी पाणी हक्काचे असल्याने कर्नाटकातील पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून सात महिन्यांचा कार्यक्रम बनविला जातो. त्यात ज्या-त्या महिन्यात लागणाऱ्या पाण्याची नोंद असते. 

हेही वाचा - बेळगावात टीईटीत 2 लाख परीक्षार्थींपैकी फक्त 8 हजार पास

शिवाय, दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांची कोल्हापुरात संयुक्त बैठक होते. त्यात महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून कर्नाटकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते. गतवर्षी पावसाळा लांबल्याने नोव्हेंबरऐवजी डिसेंबरपासून पुढे सात महिन्यांसाठी पाणी वाटपाचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र यंदा नोव्हेंबर-मेसाठी पाणी वाटप पूर्ववत होणार आहे. सध्या भागातील वेदगंगा व दुधगंगा नदीपात्रात पाणी प्रवाहित राहिले आहे. यापुढे पाणी वाटप कार्यक्रमानुसार पाणीपुरवठा होणार आहे.

"२०२०-२१ मधील पाणीवाटप कार्यक्रमाचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे. डिसेंबरमध्ये कोल्हापुरात दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी घेतली जाईल. सात महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राने चार टीएमसी पाणी कर्नाटकला पुरविणे बंधनकारक आहे."

- जी. डी. मंकाळे, सहायक कार्यकारी अभियंता, दूधगंगा प्रकल्प, निपाणी

संपादन - स्नेहल कदम 

loading image