"सर्जिकल स्ट्राइक' करणारा कुलसचिव असावा...! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - येत्या 15 नोव्हेंबरला शिवाजी विद्यापीठात कुलसचिवपदासाठी मुलाखत प्रक्रिया होत आहे. माजी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यावर नेमलेली चौकशी समिती पाहता, नव्या कुलसचिवांकडून दर्जेदार कामाची अपेक्षा केली जात आहे. कुलगुरूंच्या शब्दाला मान देणारा, विद्यापीठात तळ ठोकून बसणारा व चुकीच्या प्रकारांवर "सर्जिकल स्ट्राइक' करणारा कुलसचिव मिळावा, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळातून व्यक्‍त होत आहेत. 

कोल्हापूर - येत्या 15 नोव्हेंबरला शिवाजी विद्यापीठात कुलसचिवपदासाठी मुलाखत प्रक्रिया होत आहे. माजी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यावर नेमलेली चौकशी समिती पाहता, नव्या कुलसचिवांकडून दर्जेदार कामाची अपेक्षा केली जात आहे. कुलगुरूंच्या शब्दाला मान देणारा, विद्यापीठात तळ ठोकून बसणारा व चुकीच्या प्रकारांवर "सर्जिकल स्ट्राइक' करणारा कुलसचिव मिळावा, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळातून व्यक्‍त होत आहेत. 

डॉ. मुळे यांनी कुलसचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते विविध कारणांनी चर्चेत राहिले. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांच्याकडून त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या. त्यांची 2010 ते 2015 मध्ये केलेल्या नोकरभरतीसंदर्भात सोलापूरचे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांच्याकडून चौकशी सुरू आहे. माजी न्यायमूर्ती जे. एन. शानबाग यांच्याकडेसुद्धा डॉ. मुळे यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नव्या कुलसचिवांकडून विद्यापीठाची प्रतिमा उंचावली जावी, हीच अपेक्षा आहे. 

माजी कुलसचिव डॉ. बी. पी. साबळे यांची कारकीर्द लक्षात राहण्यासारखी राहिली. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 नुसार परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखाधिकारी, बीसीयूडी व कुलसचिव ही चार पदे निर्माण झाली; मात्र तत्पूर्वी डॉ. साबळे यांच्याकडे या पदांचा कार्यभार होता. त्यांनी तो सक्षमपणे सांभाळला. आता विद्यापीठाला कुशल प्रशासक, संपूर्ण यंत्रणा माहीत असणारा, विद्यापीठ प्रश्‍नांशी परिचित असणारा कुलसचिव हवा आहे. "नेक्‍स्ट टू कुलगुरू' कुलसचिव असतात, याचे भान ठेवून काम करणारा असावा. 

- मिलिंद भोसले, सदस्य, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ 

कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित ठेवल्याने विद्यापीठाचेच नुकसान होते. प्रश्‍नांची तड लागली, की विद्यापीठाचा गाडा सुरळीत चालतो. नव्या कुलसचिवांनी प्रलंबित प्रश्‍न समजावून घेऊन ते सोडविले पाहिजेत. अन्यथा प्रशासन विरुद्ध कर्मचारी असा संघर्ष सुरूच राहील. ते टाळायचे असेल, तर प्रशासन व कर्मचारी यांच्यात समन्वयक म्हणून काम करणारा कुलसचिव असावा. 
सुनील देसाई, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघ 

विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबरोबर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांचा अभ्यास कुलसचिवांना हवा. त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशक हवे. महाविद्यालयीन व विद्यापीठ प्रगतीसाठी ते झटणारे असावेत. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न ताबडतोब सुटतील, यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावे. 
-महेश निलजे, पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना 

नवा कुलसचिव ऍडमिनिस्ट्रेशनमधला अनुभवी हवा. विद्यापीठाची लक्‍तरे दुर्दैवाने आज बाहेर पडताहेत. त्यांना फाटा देणारा व चौकशी समित्यांचा ससेमिरा मागे लागणार नाही, याचे भान असणारा असावा. विद्यापीठातील चुकीच्या प्रकरणांवर "सर्जिकट स्ट्राइक' करण्याची धमक त्याने ठेवायला हवी. महत्त्वाचे म्हणजे या पदावरील व्यक्तीने विद्यापीठात तळ ठोकून बसायला हवे. 
- अमित वैद्य, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 

Web Title: process is being interview for the post of Secretary