आयाराम- निष्ठावंतांत रस्सीखेच ! 

उमेश बांबरे
Tuesday, 10 December 2019

आपल्या विचारांचे पदाधिकारी कसे होतील, याबाबत उदयनराजे भोसले समर्थकांकडूनही प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली आणि साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या प्रक्रियेपासून लांब राहणे पसंत केल्याचे चित्र आहे.

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित झाली असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत पदाधिकारी निवडीत आयाराम आणि निष्ठावंतांत रस्सीखेच सुरू झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे अॅप डाऊनलाेड करा
 
भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवड होईल. संपूर्ण जिल्हा डोळ्यासमोर या निवडी होणे आवश्‍यक असताना सर्व प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित सुरू आहे.

उदयनराजे भोसले समर्थकांकडूनही प्रयत्न, मात्र...

सध्या 11 तालुकाध्यक्ष, 16 मंडलाध्यक्ष, तीन जिल्हा समन्वयक आणि जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष निवड ही 15 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी सध्या भाजपअंतर्गत गट सक्रिय झाले आहेत. प्रारंभी भाजपच्या सक्रिय सदस्य निवडीत साताऱ्यातील दोन्ही राजांनी लक्ष घातले, तर पदाधिकारी निवडीमध्ये आपल्या विचारांचे पदाधिकारी कसे होतील, याबाबत उदयनराजे भोसले समर्थकांकडूनही प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली आणि साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या प्रक्रियेपासून लांब राहणे पसंत केल्याचे चित्र आहे.
 
हेही वाचा - पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार 

सध्या मंडलाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेची सर्व सूत्रे कऱ्हाडातून हालत आहेत. त्यासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. या सर्व प्रक्रियेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने विक्रम पावसकरच पुन्हा जिल्हाध्यक्ष होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत; पण भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते सातारा शहर आणि तालुक्‍यासह इतर तालुक्‍यांतही आहेत, तसेच उपरे, आयारामही या प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी निवडीत आयाराम विरुद्ध निष्ठावंत अशी चुरस पाहायला मिळत आहे.

अवश्य वाचा - आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे 

या निवडीची सर्वप्रक्रिया कऱ्हाडातूनच होत असल्याने सातारा विभागातील दोन्ही राजे या प्रकियेपासून बाजूला गेल्याचे दिसत आहे. मध्यंतरी उदयनराजे समर्थकांनी आपल्या विचारांचा भाजपचा जिल्हाध्यक्ष कसा होईल, याबाबतचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आता तेही मागे पडल्याचे दिसते आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या पदाधिकारी निवडीत आयारामांना संधी मिळणार, की निष्ठावंतांना याची उत्सुकता आहे. 

नवीन कार्यकर्ते भाजपमध्ये रुळणार? 

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये नव्याने आलेले कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अद्याप रुळलेले नाहीत. सातारा पालिकेत दोन्ही राजांच्या दोन आघाड्या आणि भाजपचे नगरसेवक असे तीन वेगवेगळे गट दिसतात; पण दोन्ही राजे भाजपमध्ये असल्याने भाजपसह दोन्ही आघाड्यांनी एकत्र येऊन विकासकामे करणे आवश्‍यक आहे. मात्र, तसे होत नाही, सर्व जण आपापल्या ठिकाणीच राहात आहेत. त्यामुळे नव्याने आलेले कार्यकर्ते भाजपमध्ये रुळणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Process Of Electing The Satara District President Of The Bharatiya Janata Party Will Begin Soon