
मंद्रुळकोळ्यात महिलांच्या ग्रामसभेमध्ये ठराव; ताईगडेवाडीतील दारूबंदीप्रश्नी आंदोलनकर्त्या महिलांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
ढेबेवाडी : गावचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणारी आणि परिसरात व्यसनाधिनता वाढायला कारणीभूत ठरलेली मंद्रुळकोळे (ता.पाटण) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व दारू दुकाने व बिअरबार बंद करण्याची मागणी नुकतीच महिलांच्या ग्रामसभेत करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी हात वर करून दारूबंदीचा ठरावही केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप
मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र ढेबेवाडी बाजारपेठेच्या परिसरात असून तीन बिअरबार आणि दोन देशी-विदेशी दारू विक्रीची दुकानेही त्यातच समाविष्ट असल्याने या ठरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंद्रुळकोळे येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात सरपंच अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील, उपसरपंच पोपटराव कळंत्रे, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे, सदस्या रत्नमाला धस, रेखा ढेब, नीलम सुतार, शारदा सुतार, विजया जैंजाळ, दीपाली पाटील, उज्वला साबळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हणमंतराव काळुगडे, पोलिस पाटील विजय लोहार आदींसह महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा : 280 कोटींच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
सभेत दारूबंदीवर गांभीर्याने चर्चा झाली. गावासह परिसरातील जनतेचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कार्यक्षेत्रातील दारू दुकाने व बिअरबार बंद करावेत, अशी मागणी यावेळी महिलांनी केली. हात वर करून तसा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
अन्य उपक्रमांबाबत चर्चा
या सभेत 15 व्या वित्त आयोगातून महिलांशी संबंधित विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला. गावातील प्रत्येक प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेणे, प्रत्येक वर्षी जन्मलेल्या मुलीच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव ठेवणे, महिला व बालकल्याण तसेच ज्येष्ठ महिलांसाठी दहा टक्के खर्च करणे, गावातील सर्व गटारे बंदिस्त करणे आदी ठरावही करण्यात आले. संतोष घोडे यांनी प्रास्ताविक केले. पोपटराव कळंत्रे यांनी आभार मानले.
""गावात शांतता नांदावी, लोकांचे स्वास्थ्य बिघडू नये यासाठी महिलांनी एकत्र येवून घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्या संदर्भातील पाठपुराव्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.''
मंदाकिनी पाटील, माजी सदस्या, जिल्हा परिषद, सातारा
""ग्रामपंचायतीने दीड वर्षाच्या कालावधीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. आदर्श गाव निर्मितीत आजचा दारूबंदीचा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.''
अमोल पाटील, सरपंच, मंद्रुळकोळे.
आडव्या बाटलीसाठी खुले मतदान घ्या
ढेबेवाडी : ताईगडेवाडी (तळमावले, ता. पाटण) येथील आडव्या बाटलीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिसऱ्यांदा केलेली स्वाक्षऱ्यांची पडताळणी आणि त्यातून हाती आलेले पहिल्या टप्प्यातील यश यामुळे आंदोलनकर्त्या महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, ही लढाई यशस्वी होण्यासाठी गुप्त पद्धतीऐवजी खुले मतदान घेण्याची मागणी सिताई फाउंडेशने महिलांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अवश्य वाचा : #MondayMotivation एकीचे बळ
ताईगडेवाडी (तळमावले) येथील शासनमान्य दारू दुकाने आणि बिअर बार बंद करावेत, या मागणीसाठी तेथील महिलांनी काही महिन्यांपासून आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. तेथील सिताई समूहाच्या संस्थापिका कविता कचरे यांनी याप्रश्नी महिलांना एकत्र करून गतवर्षी महिलादिनी मोर्चा काढून लढ्याचे रणशिंग फुंकले होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे त्यांनी त्या त्या वेळी केलेल्या यासंदर्भातील मागणीनुसार दारूबंदीच्या निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली. अशा प्रक्रियेत 25 टक्क्याच्यावर
स्वाक्षऱ्यांची पडताळणी आवश्यक असते.
अवश्य वाचा : दारू प्याल्यास दहा हजाराचा दंड !
पहिल्या पडताळणीवेळी 15.98 तर दुसऱ्या वेळी 23 टक्के महिलांची उपस्थिती असल्याने तिसऱ्यांदा आलेल्या महिलांच्या अर्जानुसार काही दिवसांपूर्वीच पुन्हा स्वाक्षऱ्यांची पडताळणी झाली. अर्जावर स्वाक्षरी केलेल्या 286 पैकी 178 महिलांनी त्यास हजेरी लावल्याने लवकरच ग्रामसभा होवून मतदान होईल, असा अंदाज आहे.
सामाजिक स्वास्थ्य बिघडले
हे मतदान गुप्तऐवजी खुल्या पद्धतीने घेण्याची मागणी आंदोलनकर्त्या सिताई फाउंडेशन व बचतगट फेडरेशनने निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन सुपूर्द करण्यात आले. ताईगडेवाडीतील सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलेले आहे, अल्पवयीन मुलेही दारू पिऊन दंगा करत असून, मुलींच्या छेडछाडीच्या घटना सुरू आहेत. आम्ही दारूबंदीसाठी केलेल्या मागणीनुसार स्वाक्षऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, आता आडव्या बाटलीसाठी तत्काळ ग्रामसभा घेऊन मतदान प्रक्रिया राबवावी.
ताईगडेवाडी ग्रामीण भागात असल्याने अनेक महिला निरक्षर व वयोवृद्ध आहेत. त्यामुळे गुप्त मतदान न घेता खुले मतदान घेण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
हेही वाचा : कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लागले आहेत निवडीचे वेध
""आडव्या बाटली संदर्भातील यापूर्वीचे शासकीय अध्यादेश, नियमावली याला अनुसरून मतदानाच्या खुल्या पद्धतीचाच विचार होईल आणि ताईगडेवाडीतील बाटली नक्की आडवी होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.''
कविता कचरे, अध्यक्षा, सिताई समूह.
सातारा सातारा सातारा