सलग ११ वर्षे एकरी ११५ टन ऊस उत्पादनाची अशी ही किमया...

तानाजी बिरनाळे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नवतंत्रज्ञानाची कास आणि जैविक खतांचा वापर करून यंदाच्या गळीत हंगामातही ४७ गुंठे क्षेत्रांत १३६ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन अकराव्या वर्षीही एकरी ११५ टनाचे उद्दिष्ट साध्य करून शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

कारदगा (बेळगाव) - येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण ईश्वर पसारे व भाऊसाहेब पसारे या बंधूंनी ऊस उत्पादनात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. नवतंत्रज्ञानाची कास आणि जैविक खतांचा वापर करून यंदाच्या गळीत हंगामातही ४७ गुंठे क्षेत्रांत १३६ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन अकराव्या वर्षीही एकरी ११५ टनाचे उद्दिष्ट साध्य करून शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

ठिबकद्वारे खत व पाणी व्यवस्थापन

अनेक वर्षांपासून पसारे बंधूंनी शेतीमध्ये नावलौकिक मिळविला आहे. कमी क्षेत्रात जादा उत्पन्न घेण्याची त्रिसूत्री त्यांनी अवलंबली आहे. ऊस उत्पादनाबाबत ते म्हणाले, ‘‘हुपरीतील जवाहर कारखान्याच्या १२५ मे. टन झेप या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जादा उत्पादनाबरोबरच जमिनीचा पोत टिकवून ठेवणे या दुहेरी उद्देशाने जमिनीची पूर्व मशागत करून योग्य प्रमाणात शेणखत घातले. त्यानंतर डेंच्या हिरवळीचे खत घेऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविला. एक जुलै रोजी ४७ गुंठे जमिनीत को-८६०३२ जातीचे बियाणे वापरून एकडोळा पद्धतीने साडेचार फूट सरीमध्ये दोन फूट अंतरावर एक डोळा लागण बेसल डोस टाकून केली. लागणीनंतर हुपरीतील जवाहर कारखान्याच्या नियोजनातील शेती योजनेच्या तक्‍त्याप्रमाणे शेती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार रासायनिक, सेंद्रिय, जैविक खताची अळवणी व फवारणी केली. भरणीनंतर ठिबकद्वारे खत व पाणी व्यवस्थापन केले. हुमणीची दक्षता घेऊन नुकसान टाळले. उसाची संख्या नियोजन करून एकरी उसाची संख्या अबाधित राखली.

वाचा - चंदगडी भाषा आता युजीसी अभ्यासक्रमात...

‘जवाहर’चे माजी संचालक बाबासो नोरजे यांनी पसारे यांच्या प्लॉटला भेट देऊन कौतुक केले आहे. ‘जवाहर’चे चेअरमन प्रकाश आवाडे यांची साथ शेती अधिकारी किरण कांबळे, उपशेती अधिकारी साठे, ए. डी. चौगुले, शेती मदतनीस विनय पाटील, भरत भागाजे, विकास तायशेट्टी, बाबासो माणगावे, अमोल पाटील, बाबू मायपणावर यांचे मार्गदर्शन व कुटुंबातील सदस्यांचे कष्ट याकामी आल्याचे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय खते व ठिबक सिंचनचा वापर करून पाणी, माती परीक्षण केले. त्याप्रमाणे खतांची मात्रा, किडीचे व्यवस्थापन व उसाची संख्या नियंत्रित ठेवून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केला. त्यात यश आल्याने उत्पादनात मैलाचा दगड पार करता आला.
- लक्ष्मण पसारे, शेतकरी, कारदगा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: production of sugarcane recorded by pasare brothers belgum marathi news