
सुलेमान नावाच्या मौल्यवान खड्याच्या तपासणीसाठी सांगलीतील व्यावसायिकास सव्वा पाच लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
सांगली ः सुलेमान नावाच्या मौल्यवान खड्याच्या तपासणीसाठी सांगलीतील व्यावसायिकास सव्वा पाच लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांविरोधात फसवणुकीचा विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक पाटील (वय 45), दिलावर मन्सुर पटेल (वय 44, दोघे रा. नांदणी, शिरोळ), अरुण साखरे (वय 55, इचलकरंजी), तात्यासाहेब आप्पासाहेब आडके (वय 42, जयसिंगपूर) आणि अनोळखी एक अशी त्यांची नावे आहेत. 27 फेब्रुवारी ते 16 मार्च 2020 मध्ये ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संदीप महादेव बोरगावे यांनी फिर्याद दिली. ते कुपवाड येथील शारदानगर येथे राहण्यास आहेत. बोरगावे यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. संशयितांनी बोरगावे यांचा विश्वास संपादन करून ओळख निर्माण केली होती. 16 मार्च 2020 रोजी संशयित बोरगावे यांना भेटले. संशयितांजवळ असणारा एमपी (सुलेमान) हा मौल्यवान खडा तपासायचा आहे, असे सांगितले. पुण्यातील एक कंपनी त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी साडे सहा लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले.
विश्वास संपादन करून संशयितांनी सव्वा पाच लाख रुपये विश्रामबाग येथे घेतले. त्यानंतर बोरगावे यांनी पैशांची मागणी केली. मात्र, संशयितांनी देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मोटारीतून (एमएच 09, 0355) येवून पैशांची मागणी करू नको, विसरून जा, असा दम दिला. तसेच हत्यार दाखवून धमकीही दिली.
फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बोरगावे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर फसवणुकीसह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
संपादन : युवराज यादव