मिरजेतील व्‍यावसायिकास १३ लाखांना कोल्‍हापुरात लुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

कोल्हापूर - पैसे पडल्याचे चालकाला सांगून मोटारीतील रोकड, सोन्याच्या नाण्यासह १२ लाख ९४ हजारांचा किमती ऐवज असलेल्या दोन बॅगा चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास राजारामपुरी पोलिस ठाण्यातील दोन पथके करीत आहेत.

कोल्हापूर - पैसे पडल्याचे चालकाला सांगून मोटारीतील रोकड, सोन्याच्या नाण्यासह १२ लाख ९४ हजारांचा किमती ऐवज असलेल्या दोन बॅगा चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास राजारामपुरी पोलिस ठाण्यातील दोन पथके करीत आहेत. सीसीटीव्हीत तीन संशयित चोरटे कैद झाले असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती, शांतिकुमार बळवंत यड्रावे (वय ४३, रा. धामणी रोड, मिरज, सांगली) मोबाईलचे डिस्ट्रीब्युटर आहेत. ते १० जुलैला पुण्यातील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसमवेत मोबाईल शॉपींना भेटी देत होते. जनता बाजार चौक ते बागल चौक दरम्यान दुपारी सव्वा चारच्या सुमारास ते मोबाईल शॉपीमध्ये गेले होते. त्यांनी दोन बॅगा मोटारीत ठेवल्या होत्या. त्यात २ लाख ८० हजाराची रोकड, ७ लाख रुपयांची सोन्याची नाणी, लॅपटॉप, फोटो व मोबाईल, असा १२ लाख ९४ हजारांचा किमती ऐवज होता; पण चोरट्याने दोन्ही बॅग लंपास केल्या. याबाबतची फिर्याद यड्रावे यांनी काल राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली.

जनता बझार चौक ते बागल चौक दरम्यान मोटार थांबल्यानंतर चालकाजवळ तीन ते चार चोरटे आले. त्यांनी मोटारी खाली पैसे पडल्याचे सांगितले. तसा चालक मोटारीतून उतरून पैसे उचलत असताना संशयितांनी मागील दरवाजा उघडून त्यातील दोन बॅगा लंपास केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professional from Miraj looted in Kolhapur