राधानगरीचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर : जागतिक बॅंकेचे प्रतिनिधी राजन सिंग, रंजन समंतराय, युकियो टनाका यांना राधानगरी धरणाची माहिती देताना राजेंद्र संकपाळ, रोहित बांदिवडेकर आणि एस. आर. पाटील.
कोल्हापूर : जागतिक बॅंकेचे प्रतिनिधी राजन सिंग, रंजन समंतराय, युकियो टनाका यांना राधानगरी धरणाची माहिती देताना राजेंद्र संकपाळ, रोहित बांदिवडेकर आणि एस. आर. पाटील.

कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, रोहित बांदिवडेकर व कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी जागतिक बॅंकेचे प्रतिनिधी राज सिंग, रंजन समंतराय, युकियो टनाका यांना प्रत्यक्ष राधानगरीत जाऊन धरणाची माहिती दिली. जागतिक बॅंकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

बोगद्याद्वारे गेलेल्या पाण्यामुळे दुष्काळ भागातील ५३ लाख हेक्‍टरवरील शेतीलाही याचा फायदा होणार आहे
- एस. आर. पाटील,
अभियंता

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबची विस्तृत माहिती घेतली. श्री. संकपाळ, श्री. बांदिवडेकर व श्री. पाटील यांनी राधानगरी धरणाचे आपत्कालीन दरवाजे सक्षम करावे लागतील. तरच, पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मदत होणार असल्याचे सांगितले. याशिवाय कोल्हापुरातील पूरस्थिती कमी करण्यासाठी कुंभी, कासारी, वारणा, निरा, भिमा नदीमार्गे उजणी धरणात बोगद्याद्वारे पाणी सोडावे लागणार आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यात पाणी पुरवठा करता येईल.

यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच तालुके, सातारा जिल्ह्यातील ४, सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ व मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील एका तालुक्‍याला याचा चांगला फायदा होणार आहे. या प्रकल्पाला मदत झाली तर जिल्ह्यातील पूर कमी होण्यास आणि दुष्काळी जिल्ह्यातील चित्र बदलण्यास मदत होणार आहे. यावर जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींनीही राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुरू होण्याआधी आपत्कालीन दरवाजे तत्काळ सुरू करता येतील, अशी व्यवस्था करावी लागेल यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना दिली. मात्र, हे धरण ऐतिहासिक आहे. यामध्ये बदल करता येत नाही. त्यासाठी दुसरा प्रकल्प राबवता येतो का? याचा विचार करावा, अशीही मागणी श्री. संकपाळ यांनी केली.

दरम्यान, जिल्ह्यात आलेल्या पथकामध्ये अनुप कारनाथ, पीयूष शेखसरीया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, रंजन सामंतराय, युकीओ टनाका, आय जसब्रॅंड एच डी जोंग, विजयशेखर कलवाकोंडा, इड्यूरडो फेरियरा यांचा समावेश होता. 

११५ टीएमसी पाणी वाया :  
यावर्षी पुरामध्ये ११५ टीएमसी पुराचे पाणी वाया गेले आहे. हेच पाणी बोगद्याद्वारे दुष्काळग्रस्त भागात दिले, तर तेथील दुष्काळ कमी होईल. याशिवाय, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात निर्माण होणारी पूरस्थिती कमी होण्यास मदत होईल, असे अभियंता एस. आर. पाटील यांनी सांगितले. 

राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याशिवाय पाणी सोडता येत नाही. याचाच परिणाम म्हणून यावर्षी अतिवृष्टी आणि धरणातील पाणी एकदमच नदीपात्र सोडले गेले. सध्या, राधानगरीच्या स्वयंचलित दरवाजासह नवीन हॅड्रोलीक दरवाजे बसविणे गरजेचे आहे. धरण ७० किंवा ८० टक्के भरल्यास याच हॅड्रोलिक दरवाजातून थोडे-थोडे पाणी सोडून पूरस्थिती नियंत्रणात आणता येईल. याशिवाय, धामणीच्या अपूर्ण प्रकल्पास २५० कोटी मिळाल्यास ३.८५ टीएमसी पाणी साठवता येईल. 
- रोहित बांदिवडेकर

उड्डाण पूल, उंच रस्त्यांचा प्रस्ताव
पुरामुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्ग बंद झाले होते, असे मार्ग उंच करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. याशिवाय, शहरात आवश्‍यक तेथे उड्डाण पूल करणे, महावितरणचे केंद्र उंचावर बसविणे, विजेचे उंच खांब (मोनोपोल) बसविणे, धरण क्षेत्राच्या खाली रेनगेज नेटवर्क आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष करून गावांना पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा तयार केली जाणार आहे. 

संगणकीय सादरीकरण
जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत संगणकीय सादरीकरण केले. या वेळी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com