दफनभूमीसाठी जागा संपादनाचा प्रस्ताव तातडीने द्या...

बलराज पवार
Monday, 8 February 2021

सांगलीत ख्रिश्‍चन समाजाच्या दफभूमीसाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आवश्‍यक निधी दिला जाईल, असे आश्वासन कृषी, सहकार व अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले.

सांगली : सांगलीत ख्रिश्‍चन समाजाच्या दफभूमीसाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आवश्‍यक निधी दिला जाईल, असे आश्वासन कृषी, सहकार व अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले. तसेच दफनभूमीसाठी आरक्षित जागा संपादन करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले. 

ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीसाठी बेथसदा प्रार्थना केंद्राचे अध्यक्ष व जिल्हा अल्पसंख्याक समितीचे माजी सदस्य अशोक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्‍चन धर्मगुरू व नागरिकांनी मंत्री विश्वजित कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले. यासाठी कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी पुढाकार घेतला. श्री. लोंढे म्हणाले,""सांगली नगरपालिकेने ख्रिश्‍चन समाजाला दफनभूमीसाठी दिलेली जागा आता संपली आहे. या दफनभूमीत जागा शिल्लक नाही, त्यामुळे पूर्वी दफन झालेल्या जागेवरच आता नवीन मृतदेह दफन करावा लागत आहे. त्यामुळे समाजात नाराजी आहे. सांगलीसह मिरज व जिल्ह्यातील ग्रामीण भागातही ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गंभीर आहे. यात शासनाने लक्ष घालून या समाजाला न्याय द्यावा.'' 
मदनभाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे म्हणाले,""शामराव नगर येथील सहा एकर जागा दफनभूमीसाठी आरक्षित आहे. यातील दीड एकर जागा ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीला देण्याचा ठराव महापालिकेने केला. मात्र जागा भूसंपादन करण्यात अडथळे येत आहे. यासाठी शासनाने अल्पसंख्याक विभागातून महापालिकेला निधी द्यावा. जयश्री पाटील यांनीही शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ख्रिश्‍चन समाजाचा दफनभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मंत्री कदम यांच्याकडे केली.'' 

मंत्री कदम यांनी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून दीड एकर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव तत्काळ शासनास सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी युवा नेते जितेश कदम, देवदान लोंढे, सतीश घाडगे, सॅमसन इम्मानुएल आदी उपस्थित होते.

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Propose to acquire space for burial immediately ...