शासकीय कार्यालयात प्रोटोकॉलचा बागुलबुवा  

सुधाकर काशीद
सोमवार, 22 मे 2017

कोल्हापूर - सर्किट हाऊसवर एखाद्या खात्याचा वरिष्ठ किंवा प्रमुख उतरलेला असतो. भेटीस येणाऱ्यांची रिघ लागलेली असते. रात्री जेवणाची लगबग सुरू असते. साहेबांना हे आवडते, ते आवडते असे सुरू असते. अशा वेळी त्या गडबडीतही फक्त एका व्यक्तीची धावपळ सर्वांच्या नजरेत येत असते. आत-बाहेर करून त्याची धांदल उडालेली असते. 

कोल्हापूर - सर्किट हाऊसवर एखाद्या खात्याचा वरिष्ठ किंवा प्रमुख उतरलेला असतो. भेटीस येणाऱ्यांची रिघ लागलेली असते. रात्री जेवणाची लगबग सुरू असते. साहेबांना हे आवडते, ते आवडते असे सुरू असते. अशा वेळी त्या गडबडीतही फक्त एका व्यक्तीची धावपळ सर्वांच्या नजरेत येत असते. आत-बाहेर करून त्याची धांदल उडालेली असते. 

मोबाईलवर त्याचे ‘जी साहेब, जी साहेब’ सुरूच असते. आतून कोणी काय सांगायचा अवकाश ‘नाही’ म्हणायचे नाही एवढेच त्याला शिकवलेले असते. वरिष्ठांचे खाणे-पिणे होईपर्यंत नव्हे ते झोपेपर्यंत याची धावपळ सुरूच असते. उशिरापर्यंत एवढी धावपळ करूनही त्याला पुन्हा सकाळी सहाच्या ठोक्‍याला सर्किट हाऊसच्या व्हरांड्यात येऊन  थांबायचे असते.

अशा प्रकारच्या कामाला शासकीय, निमशासकीय अलिखित भाषेत प्रोटोकॉल म्हणून ओळखले जाते; पण आता कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘प्रोटोकॉल’ या शब्दाचा नेमका अर्थ जिल्हा परिषदेकडे मागितला आहे. कारण लाच खाताना पकडल्या गेलेल्या एका अधिकाऱ्याने प्रोटोकॉलसाठी हे करावे लागते, अशा आशयाचे वाक्‍य वापरले आहे. प्रोटोकॉल हा शब्द भ्रष्टाचाराशी कसा निगडित आहे, याची छाननी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे. 

वास्तविक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी मूळचे पोलिस दलातलेच. आपल्या पोलिस दलात हा प्रोटोकॉल कसा पाळला जातो, त्यावरचा खर्च कसा केला जातो, हे त्यांना माहीत नाही, असे म्हणणे कदाचित धाडसाचे ठरेल; पण त्यांनीच आता या शब्दाचा नेमका अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रोटोकॉल म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण आल्यानंतर पुढील कारवाई होऊ शकणार आहे. 

वास्तविक प्रोटोकॉल परंपरेमुळे दोन नंबर करावे लागते, हे उघड सत्य आहे. वर्षानुवर्षे हे चाललेले आहे. किंबहुना प्रोटोकॉल शब्दाचा आधार घेऊन अनेकांनी दोन-चार पिढ्यांची कमाई केली आहे. साधारण एखाद्या खात्याचा प्रमुख किंवा वरिष्ठ दौऱ्यावर आला, तर त्याचा खर्च तो ज्या खात्याचा त्या खात्याने करावयाचा असतो. अगदी चांगल्या अर्थाने घेतले, तर हा खर्च एका मर्यादेत होऊ शकतो; पण वरिष्ठ किंवा प्रमुख आला की त्याला किमान तीन फूट उंचीचा बाराशे ते तेराशे रुपये किमतीचा पुष्पगुच्छ दिला जातो. एक क्षणभरच तो गुच्छ संबंधिताच्या हातात असतो. त्या गुच्छाकडे वरिष्ठ किंवा प्रमुख पाहातही नाहीत. तो गुच्छ तसाच विश्रामगृहाच्या दालनात पडून राहतो; पण पहिला प्रश्‍न येतो, एका गुच्छसाठी बाराशे ते तेराशे रुपये खर्च कोणत्या निधीतून केला. त्यानंतर जेवणाचा खर्च. मांसाहारी एक ताट किमान २८० रुपये व शाकाहारी ताट २०० रुपये. हवसे नवसे गवश्‍यासह हा खर्च पंधरा-वीस हजारांपर्यंत जातो. आइस्क्रीम व ‘इतर’ खर्च वेगळा असतो. वरिष्ठ किंवा प्रमुख सहकुटुंब असेल, तर कोल्हापुरी चप्पलचा जोड ‘प्रेमाने’ दिला जातो. पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडीचा दौरा आखला जातो. गाडी गुजरीत किंवा एखाद्या साडी हाऊसकडे वळली तर तो खर्च वेगळा असतो आणि ही सारी धावपळ करायला एक खात्यातलाच माणूस नेमलेला असतो. तो यासाठी ‘जोडणी’ करत असतो. सगळेच वरिष्ठ किंवा प्रमुख असा लाभ घेतात असे नाही; पण काहीजण घेतात आणि प्रोटोकॉल म्हणून ते काम काहीजण करतात. 

खर्चाची जुळणी होते कशी
 यासाठी जो खर्च होतो, तो कोण करतो? या प्रश्‍नातच त्याचे उत्तर दडले आहे. प्रत्येक खात्यात असा पाहुणचार अनुभवणारे काहीजण आहेत. मग या खर्चाची जुळणी कशी केली जाते, हे जगजाहीर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता यात लक्ष घातलेच आहे. प्रोटोकॉलचा खरा अर्थ बाहेर पडणार का, याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Prosecuting the protocol in the government office