
सांगली : भ्रष्टाचारावरून जतला आमसभेत गदारोळ
जत : महसूल विभागाच्या भ्रष्टाचारावरून तालुक्यातील ग्रामस्थांनी तक्रारीचा भडीमार केला. आमदारांनीही वस्तुस्थिती असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याचे आदेश दिले. यावर तलाठी बाळासाहेब जगताप यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याबरोबर राजशिष्टाचार सोडून बोलल्याने आमसभेत चांगलाच गदारोळ झाला.
दीड तास हा वाद सुरू होता. पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून तलाठी जगताप यांच्यावर प्रोटोकॉल न पाळल्याने निलंबनाचा ठराव झाला. शिवाय, घोलेश्वर ग्रामसेविकेने ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसभेचा अजेंडा देत नाहीत. बेकायदेशीर सभा घेऊन सदस्यांना मूळ विषयापासून गाफिल ठेल्याने घोलेश्वर गावच्या ग्रामसेविका कुंभार यांचाही निलंबनाचा ठराव झाला. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अडीच वर्षानंतर दुपारी एकला सभेला सुरुवात झाली. आठ तास ही सभा वादळी ठरली. यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, अप्पर तहसीलदार मागाडे, बीडीओ दिनकर खरात, कृषी अधिकारी हणमंत मेंडिदार, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, बाबासाहेब कोडग, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.सुरवातीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा आढावा झाला.
तर खुशाल सभा सोडा...
आमसभेत महसूल विभागाला टार्गेट केले जाण्याची शक्यता होती. यापूर्वी तलाठ्यांनी बैठका घेऊन सभा सोडण्याचा निर्णय ठरला असल्याची माहिती आमदारांना मिळताच, आमदारांनी लोकांच्या हिताची कामे करा, तुम्हाला कोणीही टार्गेट करणार नाही, जर संघटनेच्या जोरावर लोकांना वेठीस धरणार असाल तर मी गप्प बसणार नाही.
ज्याला सभा सोडायची असेल त्यांनी खुशाल जावा, असा सज्जड दमच आमदार सावंत यांनीतलाठ्यांना भरला.
वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याची बदली...
तहसील कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या व वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याकडून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय, जाब विचारणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. अशा महिलेचा टेबल बदलावा, अशी मागणी आमसभेत झाली. यावर प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी तत्काळ वादग्रस्त महिलेचा टेबल बदलू व इतर कर्मचारी नेमण्याचे आश्वासन दिले.
Web Title: Public Meeting Corruption Sangli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..