लोकसहभागातून हवा परिपूर्ण आराखडा

लोकसहभागातून हवा परिपूर्ण आराखडा

कोल्हापूर - झपाट्याने विस्तारणाऱ्या शहरात नवीन नाट्यगृहासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र त्यात केवळ अत्याधुनिक यंत्रणेचा अतिरेकी आग्रह न धरता भविष्यातील मेंटेनन्स आणि त्यासाठी आवश्‍यक कुशल तंत्रज्ञांबरोबरच स्थानिक कलासंस्थांच्या मूलभूत गरजांचा विचार प्राधान्याने होणे आवश्‍यक आहे.

एकीकडे कलापूर म्हणून मिरवायचे. कलासक्त राजर्षी शाहूंचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे कलाविषयक उपक्रम आणि त्यासाठी आवश्‍यक गोष्टींसाठी
केवळ मलमपट्टी करायची, हा गेल्या काही वर्षांतला अनुभव येथील कलाचळवळीने घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या गौरव समारंभाचे निमंत्रण द्यायला गेल्यानंतर नाट्यगृहाबाबत चर्चा झाली आणि नवीन नाट्यगृहाबाबत काय करता येईल, त्याची माहिती तत्काळ देण्याविषयी त्यांनी महापौरांसह स्थानिक नेत्यांना सूचना दिल्या.

विस्तारणाऱ्या कोल्हापुरात किमान अडीच हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनीही मांडली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि अगदी पाच ते सहा दिवसांत नियोजित आराखड्याचे सादरीकरणही झाले. प्रस्तावाच्या सादरीकरणानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा. निधीसाठी मी स्वतः प्रयत्न करेन, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे; मात्र तो आराखडा तयार करण्यापूर्वी स्थानिक कलासंस्था, तंत्रज्ञांच्या अपेक्षाही विचारात घ्याव्या लागणार आहेत.

अत्याधुनिकतेची झालर?
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण नुकतेच झाले आणि नाट्यगृह कार्यक्रमांसाठी खुलेही झाले. झालेल्या कामाबद्दल काही अपवाद वगळता फारशा तक्रारी नाहीत. मात्र पुढच्या टप्प्यातील कामाला कधी मुहूर्त लागेल, हे अद्यापही सांगता येत नाही. नूतनीकरणानंतर नाट्यगृहातील अत्याधुनिक यंत्रणा सांभाळण्यासाठी कुशल तंत्रज्ञांची वानवा आहे. दोन महिन्यांपूर्वी रात्री दहा वाजता एका नाटकाचा प्रयोग सुरू झाला आणि अर्ध्या तासानंतर ध्वनी यंत्रणा बिघडल्याने तो बंद पडला. कुशल तंत्रज्ञच उपलब्ध नसल्याने ध्वनी यंत्रणा लवकर सुरू झाली नाही.

पुन्हा साडेअकरा-बारानंतर प्रयोग सुरू झाला आणि पुढे तो दोन-अडीचपर्यंत
चालला. नाट्यगृहाच्या मॅनेजमेंट आणि इतर कामांसाठी टेंडर प्रक्रियाही झाली; पण ती अद्यापही रखडली आहे. एकूणच यापूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर पुढे ‘एसी’चे उत्तरायण अनुभवायला मिळाले आणि सध्याच्या नूतनीकरणानंतर अत्याधुनिक यंत्रणा कशी चालवायची, याबाबतचे उत्तरायण सुरू झाले आहे.

सध्या झालेल्या नूतनीकरणाचा अंतिम आराखडा तयार करताना कला संस्थांना जरूर विश्‍वासात घेतले गेले. मात्र त्याच वेळी भविष्यातील मेंटेनन्सचा खर्च आणि महापालिकेकडील निधीचा अभाव याबाबत फारशी चर्चा झाली नाही. त्यामुळेच नव्याने भाडे आकारणी करताना नाट्यगृहाचा वर्षाचा एकूण सरसकट खर्च समोर ठेवूनच तो भाड्यातून निघाला पाहिजे, या उद्देशाने झाली. हा इतिहास पाहता आता नवीन नाट्यगृहाचा आराखडा तयार करताना भविष्यातील मेंटेनन्सच्या खर्चाची तरतूद डोळ्यासमोर ठेवावी लागणार आहे. त्याच वेळी नवीन नाट्यगृहासाठी पाठपुरावा करताना केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसह
तेथील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हीच योग्य संधी
शहरात नवीन नाट्यगृहाबाबत गेली आठ ते दहा वर्षे केवळ चर्चाच होत राहिली. कधी बेलबाग, कधी शिवाजी विद्यापीठ परिसर तर कधी शाहू मिल परिसरात शाहू स्मारकमध्ये नवीन नाट्यगृह होणार, असा या चर्चेचा सूर राहिला. काही ठिकाणी जागा आरक्षणाचे प्रयत्नही झाले; पण हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. आता मात्र योग्य संधी आली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वंकष विचार होऊन प्रस्ताव सादर होणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com