खेड शिवापूर टोल नाका बंदची शिफारसच नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

पुणे- सातारा मार्गाच्या एकूण 140 किलोमीटरपैकी सद्यःस्थितीत 134 किलोमीटरच्या लांबीचे डांबरीकरण पूर्ण झाले. एकूण 62 पुलांपैकी 53 पुलांचे काम पूर्ण झाले आहे.

पुणे : राष्ट्रीय महामार्गावर पुणे- सातारा दरम्यान रुंदीकरणाचे काम सद्यःस्थितीत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 31 मे 2020 पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
 
विधान परिषदेमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील पुणे-सातारा मार्गाचे काम प्रलंबित असल्याचा प्रश्‍न आमदारांनी उपस्थित केला होता. पुणे-सातारा मार्गाचे काम वर्षानुवर्षे अपूर्णावस्थेत आहे. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रुंदीकरणाचे काम एक ऑक्‍टोबर 2010 पासून सुरू आहे. त्यास दहा वर्षे झाली, तरीही ते पूर्ण झाले नाही, याबाबतचे प्रश्‍न आमदारांनी विचारले. त्यावर श्री. चव्हाण यांनी लेखी उत्तर दिले. 
पुणे- सातारा मार्गाच्या एकूण 140 किलोमीटरपैकी सद्यःस्थितीत 134 किलोमीटरच्या लांबीचे डांबरीकरण पूर्ण झाले. एकूण 62 पुलांपैकी 53 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 9 पुलांपैकी 5 पुलांची कामेदेखील प्रगतिपथावर असून, 4 पुलांचे काम स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे देखभाल दुरुस्तीच्या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे, असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. विविध कारणांमुळे विलंब झाला असून, 31 मे 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

वाचा : खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव

कामास विलंब का?
 
पुलाची उंची, रुंदी व स्थान याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्या असतात. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी विरोध होतो. वृक्ष प्राधिकरणाकडून अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी अथवा स्थलांतरित करण्यासाठी उशिरा मंजुरी मिळालेली आहे. वन विभागाकडून उशिरा मिळालेली मंजुरी, चौपदरीकरणापासून ते सहापदरीकरणापर्यंत लागणारे भूसंपादन करताना अडचणी येत आहेत आदी कारणांमुळे पुणे-सातारा मार्गाच्या कामास विलंब होत असल्याचे श्री. चव्हाण यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. 

टोल नाका बंदची शिफारस नाही
 
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खेड शिवापूर येथील टोल नाका बंद करण्याची शिफारस केलेली नाही. विविध संघटनांनी अपूर्ण कामाच्या अनुषंगाने केलेल्या आंदोलनामुळे योग्य निर्णय घेण्याची विनंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा : प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Works Minister Ashok Chavan Statement On Khed Shivapur Toll Plaza