सातारा सुन्न

सातारा - मोती चौकात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, नागरिकांनी अतिरेक्‍यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून तीव्र भावना व्यक्‍त केल्या.
सातारा - मोती चौकात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, नागरिकांनी अतिरेक्‍यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून तीव्र भावना व्यक्‍त केल्या.

पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर जिल्ह्यात हळहळ आणि संतापही
सातारा - पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून पाकिस्तान नव्हे तर ‘टेरिरीस्तान’च असल्याचे दाखवून दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४२ जवान धारातीर्थी पडल्याने क्रांतिवीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, जवानांचा जिल्हा असलेला सातारा या घटनेने सुन्न झाला.

साताऱ्याच्या नसानसात शौर्य, देशप्रेम भिनलेले आहे. सैनिकी परंपरा घराघरांत असलेल्या शेकडो कुटुंबांनी देशासाठी आपले पुत्र, पिता, बंधू, मित्रांचे बलिदान दिले आहे. त्यामुळे कालपासून आज दिवसभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दहशतवाद्यांच्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात त्वेषाने प्रतिक्रिया उमटल्या. निषेध, पुतळा वा पाकध्वज जाळणे यांसह व्यापारपेठा बंद ठेवून प्रत्येकाने आपल्या तीव्र भावना व्यक्‍त केल्या. नागरिकांनी ठिकठिकाणी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. व्हॉट्‌सॲपसह सोशल मीडियानेही देशप्रेमाची मशाल आज प्रज्वलित ठेवली.

‘व्हॅलेंटाइन डे’ हा प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडवून आणल्याचे समजताच नेटिझन्सनी प्रेमाचे संदेश भरविणे बंद करत हल्ल्याचे संदेश सर्वत्र पाठविण्यास सुरवात केली. नेहमी ‘गुडमॉर्निंग’, शुभ प्रभात या संदेशाने होणारी दिवासाची सुरवात आज मात्र हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहून झाली. अनेकांनी डीपी, स्टेटस्‌वर श्रध्दांजली, निषेधाची चित्रे ठेवून भावना व्यक्‍त केल्या. जिल्हावासीयांनी देशाचे पराक्रमी सैनिक गमावल्याची सल व्यक्‍त करत राष्ट्रप्रेमाच्या मशाली पेटत्या ठेवल्या आहेत.

पुलवाम्यात काल घडलेली घटना अत्यंत निषेधार्य आहे. हुतात्मा जवानांना श्रद्धांजली. आता दहशतवाद्यांना जशासतसे प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर भारतीय सैन्याचा आत्मविश्‍वास ढळेल. जशासतसे उत्तर दिले तर भारतीय सैन्याचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल आणि दहशतवाद्यांवर दहशत बसेल. 
- अनंत शिंदे, सेवानिवृत्त कॅप्टन, ल्हासुर्णे, ता. कोरेगाव

पुलवामातील हा भ्याड हल्ला देशाच्या दृष्टीने घातक आहे. केंद्र सरकारने त्याला ताकदीने प्रत्युत्तर द्यावे. बलिदान दिलेले जवान आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत. देशासाठी लढणारा जवान धारातीर्थी पडणार नाही, यासाठी असे भ्याड हल्ले होऊ नयेत, यासाठी संरक्षण खात्याने दक्षता घ्यावी.
- शिवाजी कदम, निवृत्त सुभेदार, गुढे, ता. पाटण

काश्‍मीरमधील स्थिती प्रथम नियंत्रणात आणणे अत्यावश्‍यक आहे. स्थानिकांच्या पाठिंब्यामुळेच अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यातून लष्कराची मोठी हानी होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी तिथले वातावरण आधी सुरळीत होणे गरजेचे आहे.
- सुभेदार विजय मोहिते, अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा)

पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथील हल्ला हा भारतीयांच्या सार्वभौमत्वावरील हल्ला म्हणावा लागेल. पाकिस्तानी अतिरेकी जे आपल्या देशात राहिलेले आहेत, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. आगामी काळात दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी पाकिस्तानचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- दत्ताजी थोरात, उद्योजक, सातारा

काळजावर दगड ठेवून आपला जीव देशसेवेसाठी अर्पण केला, अशा कुटुंबीयांच्या ऋणात देशाचा प्रत्येक नागरिक सदैव राहील. आजच्या युवा पिढीने त्या ऋणाची जाणीव ठेवून देशसेवेसाठी सदैव तत्पर राहावे. प्रत्येकाने या जवानांनी आपल्यासाठीच बलिदान केले आहे, ही भावना ठेवावी.
- विक्रम शिंदे, सातारा

जवानांनी आपल्या प्रत्येकाच्या रक्षणासाठी आपल्या आई-बापाचा, पत्नी, मुले, कुटुंबीय, घरादाराचा त्याग केला. आम्हाला त्यांच्या शौर्य, बलिदानाचा अभिमान वाटतो. तुमच्या बलिदानाचे ऋण कसे फिटणार? आमच्या डोळ्यांतील पाणी तुटता तुटत नाही.
- विजय कदम, साकुर्डी, ता. कऱ्हाड

दहशतवाद हा दहशतवादच असतो. त्याला कोणतीही जात नसते. पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध तर केलाच पाहिजे, त्याशिवाय त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्यासाठीही भारताने प्रयत्न केले पाहिजेत. 
- इरफान इकबाल सय्यद, उद्योजक, कऱ्हाड 

दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे. त्यामुळे देश असुरक्षित आहे. सरकारने यावर ठोस पावले उचलून जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. अजून किती दिवस आपण हल्ले सोसणार?
- विद्याताई थोरवडे, गटप्रमुख, तनिष्का व्यासपीठ, मलकापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com