महाबळेश्वर : लाॅडविक पाॅईंटवरील 'ताे' मृतदेह पुण्यातील व्यक्तीचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

प्रशांत वाडेकर यांच्या नातेवाइकांशी पाेलिसांकडून संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्यांची दोन मुले व नातेवाईक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. नातेवाईकांची खात्री पटल्याने वाडेकर यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

महाबळेश्वर ः येथील लॉडविक पॉइंट नजीक असलेल्या खोल दरीच्या टोकावर कड्यामध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळून आला हाेता. पोलिसांच्या प्रयत्नाने अवघ्या 12 तासांच्या आताच त्याची ओळख पटली आहे. प्रशांत भालचंद्र वाडेकर (वय 56, रा. श्रेयस सोसायटी बंगला, शंकरशेठ रोड, पुणे) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

नक्की वाचा - Video : येथे आजही अंधश्रध्‍देचा कहरच...
 
प्राथमिक माहितीवरून विष पिऊन आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर वाडेकर  यांच्या कुटुंबांच्या ताब्यात प्रशांत यांचा मृतदेह देण्यात आला.

लॉडविक पॉइंट येथे पर्यटनासाठी आलेल्या युवकांना फोटो काढताना दरीच्या टोकावर कड्यामध्ये मृतदेह आढळला. याची माहिती युवकांनी वन विभागाचे कर्मचारी व स्थानिक स्टॉलधारकांना दिल्यानंतर काही वेळात पोलिस, महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवरक्षक लाइफलाइन रेस्क्‍यू टीमचे ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले.

जरुर वाचा -  दाेन हजार रुपये घेताना पाेलिसाला पकडले

लॉडविक पॉइंट ते हत्तीचा माथा परिसरात असलेल्या खोल दरीच्या अगदी टोकावर कड्यामधील मृतदेह बाहेर काढला. कपड्याचे वर्णन व चेहरा दिसत असल्याने फोटो व माहिती पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांच्या विविध ग्रुपवर टाकली होती.

पोलिस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी एका ग्रुपवर टाकलेली माहिती व फोटो वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पाहिली. फोटो व माहितीच्या आधारे अलंकार पोलिस ठाणे, पुणे यांच्याकडे प्रशांत भालचंद्र वाडेकर (वय 56) हे 27 डिसेंबरला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा -  येळकाेट येळकाेट जय मल्हारने दुमदुमणार पाल

त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्यांची दोन मुले व नातेवाईक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यक्ती प्रशांत वाडेकर असल्याचे नमूद केले. नातेवाईकांची खात्री पटल्याने वाडेकर यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Person Found Dead At Mahableshwars Lodwick Point