लग्नानंतर आठच दिवसात बाळाचा जन्म! काय झाले नेमके?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीवर अन्याय झाला असताना ही बाब लपवून ठेवून तिच्या नवजात अर्भकाच्या मरणास कारणीभूत होवून अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही बाब अतिशय निंदनिय अशी आहे.

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी तरुणास 10 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल.जोशी यांनी गुरुवारी सुनावली. या खटल्यात पिडीतेच्या आई-वडिलांना देखील 7 वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा : रेल्वे रुळाजवळ सापडला स्वंयसेवकाचा मृतदेह

प्रविण विजय गुंड (वय 25) असे 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विजय गोपाळ गुंड (वय 47) याच्यासह पिडीतेच्या आई-वडीलांना 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सप्टेंबर 2013 ते एप्रिल 2014 याकालावधीमध्ये आरोपी प्रविण गुंड व विजय गुंड यांनी अल्पवयीन पिडीतेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. त्यातूनच पिडीता ही गर्भवती राहिली. ही गोष्ट आरोपी विजय यास माहित झाल्यानंतर त्याने पिडीतेच्या आई-वडिलांवर दबाव आणून पिडीतेचे एका व्यक्तीसोबत लग्न लावून दिले.

हेही वाचा : संचालक ओळखीचे आहेत, अनेकांना नोकरी लावलीय! 

नदीमध्ये पुरून परस्पर विल्हेवाट
लग्नानंतर आठच दिवसात पिडीतेने एका बालकास जन्म दिला. ही गोष्ट विजय गुंड यास माहित झाल्यानंतर त्याने पिडीतेच्या आई-वडिलांसह दवाखान्यामध्ये जावून डॉक्‍टरांच्या सल्ल्याविरुध्द जावून नवजात बालकास सोबत नेले. त्यामुळे त्या बालकाचा मृत्यू झाला. त्याबालकाच्या मृत्यूला विजय आणि पिडीतेचे आई-वडील कारणीभूत ठरले. त्याबालकाच्या मृतदेहाची आरोपींनी बेगमपेठ येथील नदीमध्ये पुरून परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत पिडीतेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 12 फेब्रुवारी 2016 रोजी आरोपी प्रवीण आणि विजय विरोधात फिर्याद दाखल केली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात नवजात अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पिडीतेच्या आई-वडीलांना न्यायालयाने आरोपी केले. याप्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. यातील पिडीता, स्वतंत्र साक्षीदार, डॉक्‍टर व तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नाईक यांची साक्ष महत्वाची ठरली. 

हेही वाचा : अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!

पिडीतेस नुकसान भरपाई
सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रविण यास बालकांवरील लैंगिक अत्याचार कायद्यानुसार 10 वर्ष सक्त मजूरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी विजय आणि पिडीतेच्या आई-वडीलांना 7 वर्षे सक्तमजूरी, 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पुरावा नष्ट केल्याप्रकरणात विजय आणि पिडीतेच्या आईला 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये न्यायालयाने पिडीतेस मनोधैर्य योजनेखाली 25 हजार रुपये सरकारतर्फे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यात सरकारतर्फे ऍड. शीतल डोके, ऍड. शैलेजा क्‍यातम यांनी तर आरोपीतर्फे ऍड. धनंजय माने, ऍड. राजेंद्र फताटे यांनी काम पाहिले. 

हेही वाचा : माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

तिचे आयुष्य उध्वस्त केले
आरोपी प्रविण याने अल्पवयीन पिडीतेवर वेळोवेळी अत्याचार केले आहेत. याबाबत आरोपी विजय यास माहित असूनही त्याने पिडीतेचे इतर व्यक्तिसोबत लग्न लावून देवून तिचे आयुष्य उध्वस्त केले आहे. तिच्या आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीवर अन्याय झाला असताना ही बाब लपवून ठेवून तिच्या नवजात अर्भकाच्या मरणास कारणीभूत होवून अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही बाब अतिशय निंदनिय अशी आहे. त्यामुळे सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील शीतल डोके यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punishment for sexual assault case