Video : वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?

रविकांत बेलोशे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

इंग्लंडमधील "हे ऑन वे' या पुस्तकाच्या गावाचा संदर्भ घेत माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी कल्पकतेने आणि दिमाखात भिलार हे "पुस्तकांचं गाव' आकाराला आणले. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे पाच किलोमीटरील भिलार गावात ही अभिनव संकल्पना 1 मे 2017 रोजी पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली. 4 मे 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण झाले. भिलारचे नाव देशभरात नव्हे जगभरात झाले. ग्रामस्थांच्या प्रतिसादामुळे आणि पर्यटकांचा ओढा या गावाकडे वळल्याने गावाचे आर्थिक जीवनमान उंचावले.

भिलार (जि. सातारा) : बहुचर्चित "पुस्तकांचं गाव' प्रकल्प राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातील काही झारीतील शुक्राचार्यांकडून बासनात गुंडाळण्याचा कुटिल डाव आखला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तशा प्रकारच्या हालचाली वाढू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येथील काही कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच नसून, त्यांना काही दिवसांपुर्वी (तोंडी निरोपावरून) कामावर न येण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

कल्पना तशी साधी, पण अनोखी.. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा.. तेही अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळजवळ 25,000 ते 30,000 पुस्तके, या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्य प्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या 35 ठिकाणी केली. काम सुरू झाले. वाचकप्रेमी, पर्यटकांच्या उड्या स्ट्रॉबेरीकडून पुस्तकांच्या गावाकडे वाटचाल करणाऱ्या या गावाकडे पडू लागल्या. पण, गाव उभारी घेत असतानाच काहींकडून पुस्तकांच्या गाव संकल्पनेला खोडा घालण्याचेच प्रकार सुरू असल्याचे दिसू लागले. दोन वर्षे विनोद तावडे यांनी या संकल्पनेला भरभरून प्रेम दिले. सत्तेची खांदेपालट होण्याची चिन्हे होतानाच दुसरीकडे पुस्तकांचं गाव राहणार का? याची चिंता ग्रामस्थांना लागली होती. त्या गडबडीत विनोद तावडे यांनी भिलारमध्ये येऊन मंत्री कुणीही होवो, कुठल्याही पक्षाचे सरकार येवो, मी तरतूद करून ठेवली आहे. तुम्ही निश्‍चिंत राहा, असा दिलासा दिला.

ग्रामस्थ काही काळ सुखावले. पण, सत्तेच्या साठमारीत या विभागाचे मंत्रिपद नसल्याचा फायदा घेत मराठी भाषा विभागाच्या एका सचिवांनी मात्र पर्यटनस्थळावरील आपल्या खासगी गैरसोयीच आणि वैयक्तिक नैराश्‍येचे खापर पुस्तकांचे गाव आणि वाईच्या मंडळावर फोडले. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात सुभाष देसाई यांच्याकडे या विभागाचा कारभार आला. ग्रामस्थ व काहींनी याबाबत श्री. देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. देसाई यांनी यात लक्ष घातले आणि या नकारात्मक सचिवाला बदलले. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली, हे काम इथपर्यंतच थांबले. परंतु, या विभागातील अंतर्गत पदाधिकाऱ्यांनी मात्र, हा प्रकल्प मागे खेचण्याचाच उद्योग सध्या सुरू केल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या कार्यालयाला विनाकारण माहिती मागवणे, देयके थकवणे, नव्या कार्यक्रमांचे प्रस्ताव अडवणे हे प्रकार मंत्रालयीन पातळीवरून या विभागाकडून सुरू असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून भिलार येथील या कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. सुरवातीला दर्जेदार आणि वेगवेगळे कार्यक्रम होत होते. तेही अलीकडे बंद झाले आहेत. येथील काही कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच नाहीत. त्याहीपुढे जाऊन या कर्मचाऱ्यांना जानेवारी  अखेर कसलाही लेखी आदेश न देता फोनवरून तोंडी निरोपावरून कामावर न येण्याच्या सूचना दिल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा  आता साताऱ्यासाठी सचिन तेंडूलकर घेणार पुढाकार ?

नक्की वाचा  Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग

अचानकपणे कर्मचाऱ्यांना सूचना आल्याने हे कर्मचारी चक्रावले आहेत. काही प्रशासकीय पदाधिकाऱ्यांकडून हा प्रकल्प बासनात गुंडाळण्याचा डाव सुरू असेल तर यासाठी जनआंदोलन उभारून तो वाचवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे वाचकप्रेमी आणि ग्रामस्थांनी सांगितले आहे.

 

पुस्तकांचं गाव हा प्रकल्प भिलारची शान आहे. आम्ही ग्रामस्थांनी " तन-मन-धन'अर्पूण या प्रकल्पाला मूर्तस्वरूप आणले आहे. आता पुस्तकांचं गाव आणि भिलार हे एक वेगळं नातं निर्माण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली असतील तर आम्ही शेवटपर्यंत लढू.
- बाळासाहेब भिलारे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pustakanche Gaav Bhilar Project Will Be Closed ?