Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही 'अनसंग'

Tanaji Malusare Village
Tanaji Malusare Village

भिलार (ता. महाबळेश्‍‍वर, जि. सातारा) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित "तान्हाजी.. द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात त्यांचे मूळ गाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात चित्रपट गर्दी खेचत असतानाच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली (ता. महाबळेश्‍वर) या जन्मगावातील उल्लेखच नाही. 

इतिहासकार दत्ताजी नलावडे यांनी इतिहासाचे अनेक पुरावे व दाखले गोळा करून गोडवली हेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव हे महाड तालुक्‍यातील उमरठा हे नसून गोडवली असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर ओम राऊत यांनी तानाजी मालुसरे यांच्यावर चित्रपटनिर्मिती सुरू केली. त्यावेळी मालुसरेंच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे, दत्ताजी नलावडे व मालुसरे वारसदार यांच्यात चर्चा होऊन गोडवली या जन्मगावाचा उल्लेख होईल, असे निर्मात्यांनी सांगितले. 

परंतु, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यात हा उल्लेख कुठेही नव्हता, म्हणून तानाजी मालुसरे महाराष्ट्र एकीकरण समितीने न्यायालयात धाव घेतली. परंतु, निर्माते ओम राऊत यांनी मात्र, यावेळी आम्हाला जसा इतिहास मिळाला, तसाच आम्ही मांडला आहे, असे सांगितले. त्यामुळे आता हा तान्हाजी मालुसरेंचा इतिहास पडद्यावर आला. तो जगासमोर जाणार हे भूषणावह आहे. परंतु, त्यांचे जन्मगाव गोडवली मात्र दुर्लक्षित राहिल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे. 

मालुसरे परिवार हा मूळचा पाचगणीजवळील गोडवली गावचा. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडवली येथे गेले. शिवरायांनी बालपणात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबतच होते. तेथून पुढे शिवरायांच्या अनेक मोहिमा, लढायांमध्ये विश्वासू सहकारी म्हणून तानाजी सहभागी असत. 

नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज (कै.) शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पत्नी डॉ. शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या महाड (जि. रायगड) येथे आहेत. डॉ. मालुसरे महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. डॉ. शीतल यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या राज्यात आणि राज्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर व्याख्याने देतात. कवयित्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात ठसा उमटवला आहे. 

ऐतिहासिक दस्तऐवजात उल्लेख 
पारंपरिक लोककला आणि बखर, मोडी लिपीतील कागदपत्रांतही "तान्हाजी' असा उल्लेख आहे. ऐतिहासिक पुस्तके, पोवाडे यातूनही "तान्हाजी' असा उल्लेख आहे. शिवचरित्र साहित्य पुस्तकाच्या पान क्रमांक 431 वर "तान्हाजी मालुसरे' मोकादम मोजे गोडवली असा उल्लेख आहे. 

नरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म आमच्या गावात झाला. ओम राऊत यांनी सिनेमा निर्मिती करताना आम्हाला गावाच्या उल्लेखाविषयी शब्द दिला होता. परंतु, मालुसरेंच्या थेट वंशज डॉ. शीतल मालुसरे आणि इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी निर्मात्यांना वास्तुदर्शक माहिती न दिल्याने या सिनेमात गोडवली गावचा उल्लेख झाला नाही.'' 
- अंकुश मालुसरे, माजी सरपंच, गोडवली 


या सिनेमात आमच्या गावाचा उल्लेख न झाल्याने अजूनही तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी दुर्लक्षितच राहिली. 
- योगेश मालुसरे, गोडवली 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com