सरकार कुठले यापेक्षा आमची सामूहिक एकी महत्वाची : एकनाथ शिंदे

रविकांत बेलोशे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दोन वर्षांचा हा नावलौकिक पुसण्याचा डाव मंत्रालयीन पातळीवरून सुरू असल्याचे वृत्त भिलारमध्ये धडकले. यामुळे राज्यातील पुस्तक प्रेमींबरोबरच भिलारकर, पुस्तक घर मालक, नागरिक यांच्याकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत

भिलार (जि. सातारा) : येथील पुस्तकांचं गाव प्रकल्प राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातील काही झारीतील शुक्राचाऱ्यांकडून बासनात गुंडाळण्याचा डाव आखला जात असल्याचे वृत्त "सकाळ' आणि ई - सकाळने प्रसिद्ध करताच राज्यातील वाचकप्रेमींमध्ये निराशेची लाट पसरली. त्याचबरोबर लेखक, कवी, साहित्यिक यांनी "सकाळ'शी संपर्क साधून हा उपक्रम कायम सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, भिलारमधील वातावरण ढवळून निघाले असून, ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
 
तत्कालीन मराठी भाषा व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी कल्पकतेने भिलार गावाला पुस्तकांचं गाव बनवले. त्यामुळे भिलारचा देशभर गवगवा झाला. लेखक, संपादक, वाचक, पर्यटकांमुळे भिलार 12 महिने गजबजू लागले. त्यामुळे भिलारची आर्थिक उलाढाल बदलून गेली. पुस्तकांच्या गाव बिरुदाने गावाचं नाव जगभर पोचले. दोन वर्षांचा हा नावलौकिक पुसण्याचा डाव मंत्रालयीन पातळीवरून सुरू असल्याचे वृत्त भिलारमध्ये धडकताच राज्यातील पुस्तक प्रेमींबरोबरच भिलारकर, पुस्तक घर मालक, नागरिक यांच्याकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. 

मंत्री देसाई न्याय देतील 

विनोद तावडे म्हणाले, ""भिलार या पुस्तकाच्या गावाला मराठी भाषा, साहित्य यासाठी आगळवेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी मानाच्या अभिमानाचा हा विषय आहे. काही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि मनमानीमुळे हा प्रकल्प बंद पडणार असेल, तर ती दुर्दैवाची गोष्ट असणार आहे. पुस्तकांचं गाव हे सर्वश्री ग्रामस्थांचे श्रेय आहे. मराठी भाषामंत्री सुभाष देसाई हे गावाला स्वतः येऊन गेले आहेत. देसाई हे मराठी भाषेसाठी झटणारे नेते आहेत. त्यांनी स्वतः लक्ष देऊन कामगारांचे वेतन काढून देतील व नियुक्‍त्याही कायम करून घेतील. देसाई हे संवेदनशील असल्याने ते हा प्रकल्प बंद पडून देणार नाहीत.''
 
बाळासाहेब भिलारे म्हणाले, ""प्रकल्प गुंडाळण्याचा वावड्या उठवल्या जात असून, यात काहीही तथ्य नसून हा प्रकल्प आम्ही जीवापाड जपला आहे. प्रकल्प बंद करू न देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सामूहिकपणे मंत्रालयापर्यंत धडक देऊ.''
 
साहित्यिक रवींद्र गोळे म्हणाले, ""भिलारसारख्या ग्रामीण गावात शासनाने देशातील पहिला अभिनव प्रकल्प राबवला. याची कॉपी इतर राज्यांनी करायला हवी. एकीकडे वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र, वाचनाची संधी मिळताना अनास्था निर्माण होत असेल, तर साहित्यिक, मराठीवर प्रेम असणाऱ्या लोकांनी विचार करायला हवा.''
 
डॉ. मोहन सोनावणे म्हणाले, ""पुस्तकांचं गाव हे कोणत्या एका व्यक्ती, पक्ष किंवा सरकारचे न राहता. सदा सर्वकाळ मायमराठीचे राहावे. कालाय तस्मै नम: काळाप्रमाणे काही गोष्टी बदलतात. तसे सरकार बदललं म्हणून काय झाले? पुस्तकाचे गाव गुंडाळायच का? प्रशासकीय अडचणी काहीही असो. शासन कोणतेही असो माय मराठीच्या उत्कर्षासाठी उभा राहिलेला हा प्रकल्प सर्वांचा आहे. तो टिकला पाहिजे.''
 
भिलारच्या सरपंच वंदना भिलारे म्हणाल्या, ""पुस्तकांचं गाव या प्रकल्पामुळे आमच्या गावाचा नावलौकिक वाढला आहेच. त्यामुळे गावाला वेगळी झळाळी मिळाली आहे. आम्ही ग्रामस्थ हा प्रकल्प न थांबता अथकपणे चालू ठेवण्यास प्रयत्न करणार आहोत.''
 
प्रशांत भिलारे म्हणाले, ""पुस्तकांचं गाव मंत्रालयीन पातळीवर घडामोडींमुळे ब्रेक घेत असल्याच्या वावड्या उठत आहेत. कामगारांना पगार नसल्याचे दिसून आल्याने त्याला थोडी पुष्टी मिळत आहे; परंतु या संकल्पनेने आमच्या गावाचे जीवनमान उंचावले आहे.''

वाचा : वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?

वाचा : राजेंना चीतपट करणाऱ्या पाटलांनी उलगडले यशाचे रहस्य

जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे म्हणाले, ""तालुक्‍यात उभारलेला हा महत्त्वाकांक्षी पुस्तकांचं गाव व प्रकल्प कुणीही बंद करू शकत नाही. आमच्या तालुक्‍याला यामुळे वेगळे वलय निर्माण झाले आहे. तसे झाल्यास आम्ही सर्व ताकदीनिशी या प्रवृत्तीला विरोध करू.'' 
पुस्तक घर संचालक प्रवीण भिलारे, शशिकांत भिलारे, तेजस्विनी भिलारे, तानाजी भिलारे यांनीही प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी केली आहे. 

माझ्या मातीत झालेला पुस्तकाचा प्रकल्प बंद होणार ही वार्ताच मुळी दुर्दैवी आहे. सरकार कुठले यापेक्षा भिलारकरांच्या सामूहिक एकी आणि सहकार्याने प्रकल्प यशस्वी झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प बंद होणार नाही. सर्वांनी निश्‍चिंत राहावे. 
- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pustkanche Gaav Activity Should Be Continued Says Readers