esakal | नको रे बाबा! अंदाज व्यक्त करण्यावरही आता 'यामुळे' प्रश्‍नचिन्ह
sakal

बोलून बातमी शोधा

The question mark on predictions

- विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून चुकले अंदाज 
- अजित पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह 
- पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम 
- बहुमत सिद्ध होणार का, याची उत्सुकता

नको रे बाबा! अंदाज व्यक्त करण्यावरही आता 'यामुळे' प्रश्‍नचिन्ह

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घटना आणि घडामोडींनी गाजत आहे. 24 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजप व शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार, हे निश्‍चित मानले जात होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षांची युती तुटली आणि अनपेक्षित घडामोडी घडत अनेकांचे अंदाज चुकले. शनिवारी कोणाचाही विश्‍वास बसणार नाही, अशी घटना घडली आणि अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यावर आता अंदाज व्यक्त करायला मतदार व तज्ज्ञ राजकीय अभ्यासक तयार नसल्याचे चित्र आहे. 
2019 ची राज्यातील निवडणूक जाहीर झाल्यापासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेकजण वेगवेगळे अंदाज व्यक्त करत होते. यातील अनेकांचे अंदाज चुकले आहेत. भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या माध्यमातून रिंगणात होते. मात्र निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांची मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. 

हेही वाचा : अजित पवार देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? 
भाजपच्या जागा जास्त, पण...
 
भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानासुद्धा शिवसेना पाठिंबा देत नसल्यामुळे भाजपने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला नाही. त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रित केले. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना राज्यात सरकार स्थापन करणार हे निश्‍चित झाले होते. मात्र, त्यांना वेळ कमी पडल्याने शिवसेना वेळेत सरकार स्थापन करू शकली नाही. तिथेही अनेकांचे अंदाज चुकले. त्यानंतर राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यानंतरही अनेकांनी अंदाज व्यक्त केले; मात्र राष्ट्रवादीही सरकार स्थापन करू शकली नाही आणि तिथेही अनेकांचा अंदाज चुकला. त्यानंतर कोणताही पक्ष स्थापन करू शकला नाही. त्यामुळे राज्यात राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. मात्र, त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठकांचे सत्र वाढत गेले आणि राजकीय घडामोडींनी वेग घेतला. 

हेही वाचा : अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार 
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
 
शुक्रवारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाविकास आघाडी सरकार स्थापन करून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे निश्‍चित मानले जात होते. मात्र, शनिवारी सकाळी धक्कादायक राजकीय घडामोड घडली आणि तिथेही अनेकांचे अंदाज चुकले. 
भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिवसभरातील घडामोडींनंतर दुपारी चारच्या दरम्यान अजित पवार हे राजीनामा देणार, अशी बातमी वृत्तवाहिन्यांवर आली. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी फिरली. त्यावर पुन्हा अंदाज व्यक्त होऊ लागले. मात्र आता अनेकांनी, "नको रे बाबा! अंदाजच व्यक्त करता येईना!' अशा प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे.