नगरला शिवभोजन थाळीसाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली शहरात पाच शिवभोजन केंद्रांना मंजुरी मिळाली. योजनेच्या अंमलबजावणीविषयी पाचही केंद्रचालकांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

नगर : गरिबांसाठी अल्पदरात सुरू केलेल्या शिवभोजन योजनेला शहरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वच केंद्रांवर थाळीसाठी अक्षरक्ष: रांगा लागल्या आहेत. शिवभोजन थाळी दर्जेदार, लई भारी असून, सरकार मायबापने मोठ्या प्रमाणात योजनेचा विस्तार करावा, जेणेकरून जास्तीत-जास्त गरजूंना लाभ घेता येईल, असे साकडे घातले जात आहे.

हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सरपंच संतापले 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली शहरात पाच शिवभोजन केंद्रांना मंजुरी मिळाली. योजनेच्या अंमलबजावणीविषयी पाचही केंद्रचालकांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सरकारने घोषित केल्यानुसार राज्यभर प्रजासत्ताक दिनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ करण्यात आला. 

शिवभोजन केंद्र "हाऊसफुल्ल'

उद्‌घाटनाच्या पहिल्याच दिवशी शहरात 503, दुसऱ्या दिवशी 665, तिसऱ्या व चौथ्या दिवशी 700 पैकी 700 लाभार्थींनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला. बुधवारी दुपारी बारा वाजेपासून माळीवाडा शिवभोजन केंद्रावर लाभार्थींच्या रांगा लागल्या होत्या. शिवभोजन करणाऱ्या लाभार्थींशी "सकाळ'ने संवाद साधला असता, या योजनेविषयी अनेकांनी सरकारला भरभरून आशीर्वाद दिले. 

अवश्‍य वाचा- नाशिकमधील माय-लेकरांचा कार अपघातात मृत्यू

विस्तार होणे गरजेचे

शिवभोजन योजनेची सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सुरवात केली. तिचा गरजूंसाठी अधिकाधिक विस्तार होणे गरजेचे आहे. गरजूंना अन्न देऊन सरकार योग्य काम करीत आहे. 
- पावलस सूर्यवंशी, श्रीगोंदे 

थाळींची संख्या वाढवावी

शिवभोजन योजनेत थाळींची संख्या कमी असल्याने काहींना भोजन मिळते, तर काहींना मिळत नाही. सरकारने थाळींची संख्या वाढवून प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र लवकरात-लवकर सुरू करावे. 
- विष्णू फुंदे, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queue for a Shiva meal plate in nagar