पेट्रोल पंपांवर रांगा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पेट्रोल आणि डिझेल पंपधारकांनी आज आणि उद्या (ता. 4) दोन दिवस पेट्रोल-डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करणाऱ्या पंप चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी दिला आहे. 

आज आणि उद्या (शुक्रवारी) विविध मागण्यांसाठी पंप चालकांनी पेट्रोल-डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि जिल्ह्यात रोज लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होते. पेट्रोल डिझेलची जर खरेदीच झाली नाही तर त्याची टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेक वाहनधारकांनी बुधवारपासूनच वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेण्यास सुरवात केली. आजही सकाळपासून शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या. रिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पुरेसे पेट्रोल, डिझेल भरले जात होते. दोन दिवस पेट्रोल, डिझेलची खरेदी केली जाणार नसली तरी सर्वच पंपांवर पुरेसा साठा असल्याने टंचाई भासणार नसल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, प्रशासनानेही पंप चालकांच्या या आंदोलनाची नोंद घेतली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, ""पेट्रोल, डिझेल खरेदी न करणाऱ्या पंपचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम अंतर्गत 24 तासांपेक्षा अधिक काळ पेट्रोल, डिझेलची विक्री बंद ठेवता येणार नाही.'' 

बीपीसी, एचपी, आयओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व पंप असोसिएशनच्या सदस्यांसोबत त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले,"" ग्राहकांना वेठीस धरू नका. राखीव साठा ठेवण्यास सांगितले आहे. रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या इंधन पुरवठ्याची गैरसोय होऊ नये यासाठीही सूचना दिल्या आहेत. उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पंप चालकांच्या मागण्यांसंबंधी निर्णय होईल,'' अशी शक्‍यताही त्यांनी वर्तवली. 

ग्राहकांनी अफवांना बळी पडून विनाकारण अधिकचे पेट्रोल, डिझेल खरेदी करू नये. जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. 
- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Queues at petrol pumps