तंबाखूला सोडा... निरामय आरोग्य सांभाळा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

आज जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू सोडण्याचा व ज्यांना व्यसन नाही त्यांनी व्यसन न लागू देण्याचा निश्‍चय केला पाहिजे. 

भारताला तोंडाच्या कर्करोगाची राजधानी समजली जाते व चेष्टेने तंबाखूला राष्ट्रीय खाद्य म्हटले जाते, इथवर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा अतिवापर भारतात प्रचलित आहे. हे चित्र भीषण आहे. तंबाखूवर बंद आणण्याच्या कितीही चर्चा केल्या तरी त्या फोलच आहेत. कारण, एका आकडेवारीनुसार भारतात 14 टक्के मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतात. यावरुन तंबाखू किती जीवघेणी ठरु शकते हे लक्षात येते. त्यामुळे आज जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू सोडण्याचा व ज्यांना व्यसन नाही त्यांनी व्यसन न लागू देण्याचा निश्‍चय केला पाहिजे. 

तंबाखूचे व्यसन म्हणजे केवळ खाऊच्या पानासोबत खाण्याचा पदार्थ असे नाही. तर इतरही अनेक तंबाखूजन्य पदार्थ आहेत. ज्यांचे व्यसन जीवाला धोकादायक ठरणारे असते. अशा तंबाखूजन्य पदार्थांमध्येमध्ये स्मोकिंग (बिडी, सिगारेट, हुक्का, स्नफ) व स्मोकलेस टोबॅको (गुटका, मावा, मिश्री, खर्रा) इत्यादींचा समावेश होतो. तंबाखू खाणारा वर्गही भारतात खेडोपाडीच नसून तो लहान मोठ्या शहरांमध्येही आहे. त्यामुळेच तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. 

एकदा लागलेले तंबाखूचे व्यसन फक्त पाच टक्के लोक कायमस्वरूपी सोडू शकतात अशी आकडेवारी एका सर्व्हेतून समोर आली आहे. सुरुवातीच्या काळात तंबाखू हा चुन्यासोबत येणारा खाद्यप्रकार होता. त्यामुळे चुना तंबाखू असे सहजच म्हटले जात होते. आजही चुना तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण खेड्यांमध्ये जास्त आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग व इतर अनेक आजार होऊ शकतात. तंबाखूपेक्षा गुटखा हा जास्त हानीकारक आहे. 
तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवणामुळे शरीराच्या विविध भागांवर त्याचा विपरित परिणाम होतो. तोंडाचा कर्करोग, स्वरयंत्र, अन्ननलिकेचा कर्करोग, फुफुसाचा कर्करोग तसेच यकृत, किडनी, जठर, स्वादुपिंड, मोठे आतडे, मूत्राशय व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तंबाखूजन्य पदार्थांमुळे होऊ शकतो. 

70 पेक्षा जास्त कर्करोगजन्य घटक

पॅसिव्ह स्मोकिंगसुद्धा कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते. सिगरेट स्मोकिंगमध्ये 70 पेक्षा जास्त कर्करोगजन्य घटक असतात. कर्करोगा व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, हृदयविकार, अर्धांगवायू , फुप्फुसाचा टीबी, न्युमोनिया, दमा यासारखे आजारही होऊ शकतात. तंबाखूचे दुष्परिणाम हे केवळ कर्करोगापुरतेच मर्यादित नाही तर यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. तर स्त्रियांमध्ये गर्भपात होणे किंवा दिवसभरण्या अगोदरच डिलिव्हरी होणे, बाळाच्या मेंदू व वाढीवर परिणाम होऊन मंदबुद्धी बाळ जन्माला येणे यासारखे घातक परिणाम होऊ शकतात. 
एकूणच तंबाखूचे वरील दुष्परिणाम पाहता तंबाखूला सोडा आणि निरामय आरोग्याची कास धरा असाच सल्ला आजच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त द्यावा. 

- डॉ. गौतम पुरोहित, मुखकर्करोग तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quit smoking ... take good health