रब्बीच्या पीकविम्यासाठी लागणार एक महिना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मागच्या वर्षीचा रब्बी पीकविमा भरलेल्या राज्यातील 48 लाख शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. पावसाअभावी राज्यात दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच राज्य सरकारकडून पीकविम्याची रक्‍कम वेळेत न मिळाल्याने आता केंद्राचा हिस्सा मिळण्याकरिता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

48 लाख शेतकरी प्रतीक्षेत; केंद्राचा हिस्सा जमा होईना
सोलापूर - मागच्या वर्षीचा रब्बी पीकविमा भरलेल्या राज्यातील 48 लाख शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. पावसाअभावी राज्यात दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच राज्य सरकारकडून पीकविम्याची रक्‍कम वेळेत न मिळाल्याने आता केंद्राचा हिस्सा मिळण्याकरिता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पावसाअभावी मागच्या वर्षी खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारकडून खरीप हंगामातील नुकसान भरपाईची रक्‍कम वितरित करण्यात आली. मात्र, रब्बी हंगामाची रक्‍कम अद्याप मिळालेली नाही. राज्यातील 48 लाख 34 हजार शेतकऱ्यांनी गतवर्षी रब्बी हंगामात पीकविमा भरला. पिकांच्या पेरणीचा खर्च न निघाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना चार-सहा महिन्यांत मदतीची अपेक्षा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीसह अन्य कामात व्यग्र असलेल्या राजकीय नेत्यांना विम्याच्या प्रश्‍नाकडे पाहायला वेळच मिळाला नाही, असा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

मागील वर्षीचा रब्बी पीकविम्यातील राज्य सरकारचा हिस्सा जमा करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारचा हिस्सा जमा होण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागेल. केंद्राचा हिस्सा जमा झाल्यानंतरच शेतकऱ्यांना रक्‍कम मिळेल.
- उदय देशमुख, मुख्य सांख्यिकी अधिकारी, कृषी आयुक्‍तालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabbi Crop Insurance Farmer Wait One month