रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मायणी - येथील रिंगावण यात्रेच्या दरम्यान हमखास पाऊस पडून रब्बीच्या पिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना पावसाने गुंगारा दिला. गेले चार दिवस नुसतेच ढग आले अन्‌ गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली असून पिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

मायणी - येथील रिंगावण यात्रेच्या दरम्यान हमखास पाऊस पडून रब्बीच्या पिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना पावसाने गुंगारा दिला. गेले चार दिवस नुसतेच ढग आले अन्‌ गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली असून पिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

खटाव व माण तालुक्‍यांमध्ये सिद्धनाथ यात्रेच्या दरम्यान पाऊस पडतो. काही वर्षांपूर्वी सिद्धनाथाच्या यात्रेदरम्यान मुसळधार पावसाने खटाव, माणला झोडपून काढले होते. त्यात म्हसवडला माणकाठी भरलेल्या यात्रेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा पावसाळ्यातही खटावमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. परतीच्या पावसानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे विशेषतः खटाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील कानकात्रे, विखळे, कलेढोण, मायणी येथील मोठे तलाव कोरडे पडू लागलेत. मायणी तलाव तर पाण्याअभावी कोरडा पडला असून अनेक जण गाळाची वाहतूकही करू लागलेत. पावसाळ्यात दडी मारलेला पाऊस रिंगावण यात्रेच्या दरम्यान तरी समाधान करेल, अशी अपेक्षा होती. गेल्या आठवड्यापासून वातावरणात तसा बदलही होऊ लागला होता. 

ढग येत होते. मात्र, कुठेही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यातच विजेचाही प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. वायरमनची संख्या कमी असल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्याशिवाय पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असतानाही येरळवाडी तलावातून पाणी सोडण्यात आलेले नाही. ते लवकर सोडावे, अशी मागणी चितळी, शेडगेवाडी, निमसोड, मोराळे परिसरातील शेतकरी करीत आहेत. मायणी तलावात यंदा शेतीसाठी सोडण्याइतके पाणीच नाही. तलावात ठिकठिकाणी केवळ डबकी साचलेली आहेत. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत.

पिकांना पाणी द्यायचे कोठून?
मायणी परिसरात तलाव, ओढे, नाले, बांध-बंधारेही कोरडे पडलेत. परिणामी रब्बीच्या पिकांना आवश्‍यक तेवढे पाणी कोठून द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. ऐन बहरात आलेल्या पिकांना सध्या पाण्याची आवश्‍यकता आहे. 
त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Web Title: Rabbi fear of wasting the season