रब्बीसाठी राज्याने पसरले केंद्राकडे हात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

मार्चअखेरीस उत्तर सोलापूर, बार्शी व बल्हारपूर या तीन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून केंद्र सरकारकडे ५७ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप पैसे मिळाले नसून रक्‍कम प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप होईल.
- सुभाष उम्राणीकर, उपसचिव, मदत व पुनवर्सन, मुंबई

सोलापूर - दुष्काळाने रब्बी हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी व चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर या तीन तालुक्‍यांमधील ७३ हजार ५०१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ६० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, प्रस्ताव पाठवून तीन महिने झाले, तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

राज्यात मागील वर्षी पाऊस पडला नाही अन्‌ आता मॉन्सूनने पहिल्याच टप्प्यात हुलकावणी दिली. त्यामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत असल्याचे चित्र आहे. पावसाच्या आशेने पेरणी केलेली बहुतांश पिके (ऊस, फळभाज्या) माना टाकू लागली आहेत. खरिपाची लगबग सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने पेरणीची टक्‍केवारीही यंदा खूपच घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बॅंकांकडून कर्ज मिळेना, कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांवरील रक्‍कम भरायला पैसे नाहीत, तूर-हरभऱ्याच्या हमीभावाची रक्‍कम मिळेना, दूध अनुदान रखडले, ‘एफआरपी’ची रक्‍कम अडकलेली आणि आता दुष्काळाची मदतीचीसाठीही प्रतीक्षाच करावी लागत आहे. 

खरिपातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आतापर्यंत सात हजार १०३ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, अद्याप साडेचार लाख शेतकऱ्यांपर्यंत ही रक्‍कम पोचलीच नाही. दुसरीकडे रब्बीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवूनही त्याला मंजुरी मिळाली नसल्याने महिनाभराची प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabbi Season State Government Fund Demand Central Government