कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेत राडा

कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेत राडा

कागल - आज झालेल्या कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेत म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधाच्या ठरावावरून सत्तारूढ आणि विरोधी गटात राडा झाला. विरोधी भाजप नगरसेवकांनी असा निषेध ठराव करण्याला जोरदार विरोध केला. त्यावरून शाब्दीक खडाजंगी झाली. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फेकून मारणे, वादावादी, हमरीतुमरी, मारहाण असे प्रकार घडले. वातावरण तणावपूर्ण बनले. या तप्त वातावरणात भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. कागल नगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची घटना घडली आहे.

कागल नगरपालिकेची विशेष सभा सायंकाळी चार वाजता पालिकेच्या सभागृहात बोलाविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष आनंदा पसारे तसेच प्रभारी मुख्याधिकारी होते.

पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गुरूवारी (ता. 12) म्हाडा गृहप्रकल्पाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील उपस्थित होते. त्यांचा समरजितसिंह यांनी अवमान केला असे सांगत प्रविण काळबर यांनी समरजितसिंह यांच्या निषेधाचा ठराव सभेच्या सुरुवातीलाच मांडला. यावर भाजपचे नगरसेवक विशाल पाटील यांनी असे काही घडले नसल्याने असा ठराव या सभेत मांडता येणार नाही. असे सांगत निषेधाच्या ठरावाला कडाडून विरोध केला. भाजपच्या सर्व नगरसेवकांनीही निषेध ठराव करण्याला एकमुखी विरोध दर्शविला. त्यातून सतारूढ गटाचे नगरसेवक निषेध ठराव करण्यावर ठाम राहिले. यातून वादावादीला सुरुवात झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाला. या तणावपूर्ण वातावरणात भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला.

त्यानंतर नगराध्यक्षा माणिक माळी यांनी दहा मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. नंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. या सभेत सत्ताधारी गटाकडून सभेपुढील सर्व 11 विषयांना मंजूरी देण्यात आली. सभा संपवून सत्तारूढ गटाचे सर्व नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. यावेळी पालिका इमारती बाहेर थांबलेल्या विरोधी नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांत वादावादी होऊन मारामारीचा प्रकार पुन्हा घडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com