Radhakrishna Vikhe Patil : सहकारी दूध संघांतील भ्रष्टाचारांची चौकशी

राधाकृष्ण विखे पाटील : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेणार
Radhakrishna Vikhe Patil Inquiry corruption co-operative milk unions sangli
Radhakrishna Vikhe Patil Inquiry corruption co-operative milk unions sanglisakal

सांगली : ‘‘राज्यातील सहकारी दूध संघाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आदेश मी देत आहे. या संस्था का बंद पडल्या? याच्या मुळाशी जायला हवे. राज्यातील ८० टक्के दूध व्यवसाय सहकारी संस्थांकडे होता. त्या बंद पडल्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांना भोगायला लागू नये, अशी सरकारची भूमिका आहे, ’’ असे मत महसूल तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजारग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी. सीईओ जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘महानंद सारख्या मोठ्या संस्थेची अवस्था आज बिकट झाली आहे. एक लाख लिटरपेक्षा कमी दूध संकलन होत आहे. त्याचे व्यवस्थापन परवडत नाही. त्यामुळे दूध संघ बरखास्त केला आहे. तेथे प्रशासक नेमला असून ही संस्था आता राष्ट्रीय डेअरी बोर्डकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसू नये अशी आमची भूमिका आहे. आपले दूध स्वीकारले जात नाही अशी वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ.’’ ते म्हणाले, ‘‘दूध व्यवसायात आता स्पर्धा येणार हे नक्की. त्या स्पर्धेपासून दूर पळता येणार नाही. शेतकरी अधिक सक्षम आणि दूध व्यवसाय फायद्यात कसा येईल, याबाबत सरकार वेळोवेळी धोरण राबवेल. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन करण्याबाबतचे धोरण आम्ही राबवू.’’

मानधनाविषयी लवकरच निर्णय

ते म्हणाले,‘‘ लम्पी स्किन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ८४ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन. महाराष्ट्रात हा आजार नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून राज्य शासनाकडून अधिकाधिक जनावरांना वेळेत आणि वेगवान पद्धतीने लसीकरण करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रातील रिक्त जागा लवकर भरण्याबाबत शासन विचार करत आहे. या आजाराच्या काळात खासगी डॉक्टरांनी आणि पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मदत उभी केली. त्याबद्दल त्यांचे आभार. शिवाय खासगी डॉक्‍टरांच्या व विद्यार्थ्यांच्या मानधनाविषयीचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.’’

गोवंश हत्या बंदीचा संबंध नाही

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘गोहत्या बंदी आणि लम्पी स्किन आजारात वाढ याचा संबंध असल्याचे कुठेही स्पष्ट झालेले नाही. ज्या गाई किंवा बैल मोकाट फिरत आहेत अशांचे लसीकरण आम्ही तातडीने आणि गतीने केले आहे. गोशाळा, पांजरपोळ येथेही लसीकरणाचे प्रमाण जवळपास शंभर टक्के आहे.’’

काँग्रेसची अवस्था पाहता तेथे कसे राहू वाटेल ?

सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेसचे नेते आपल्या माध्यमातून भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत का, या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘ सध्या काँग्रेसला देशात नेतृत्व राहिलेले नाही. राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना जी काही अवस्था सुरू आहे ती पाहता त्या पक्षात राहावे असे कोणाला वाटेल. भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे वैश्विक नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्याबाबत योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले जातील. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा करण्यापेक्षा सध्या पक्षाचे काँग्रेस छोडो सुरू आहे त्यावर काम करणे गरजेचे आहे.’’

माझा अनुभाव पाहून जबाबदारी

भाजपमध्ये सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना दुसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली आहे. त्यांनी अनेक भाजप ज्येष्ठ नेत्यांना ओव्हरटेक केले आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘माझा आत्तापर्यंतचा अनुभव आणि विविध खात्यांत केलेले काम पाहता भाजपने मला ही संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली मी दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय.’’

वाईनबाबत मंत्रीमंडळ ठरवेल

राज्यात मॉल आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत विचारले असता विखे-पाटील म्हणाले, ‘‘हा विषय मागील सरकारने घेतला होता. आम्ही पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आग्रह करत होतो, त्यांनी वाईनचा निर्णय घेतला होता. आता तो विषय पुन्हा समोर आला तर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com