राधानगरीत १.२० कोटी युनिट वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

अतिरिक्त पाण्याचा वापर - विसर्गाच्या नियोजनामुळे अधिक वीजनिर्मिती शक्‍य

अतिरिक्त पाण्याचा वापर - विसर्गाच्या नियोजनामुळे अधिक वीजनिर्मिती शक्‍य
राधानगरी - पाणलोट क्षेत्रातील दैनंदिन पाऊस आणि जलाशयात होणारी पाण्याची आवक याच्या अभ्यासातून विसर्गाचे नियोजन केल्याने अवघ्या दीड महिन्यातच राधानगरी धरण पायथ्याशी असलेल्या दोन जलविद्युत केंद्रांनी मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे एक कोटी वीस लाख युनिट वीज निर्मिती केली आहे. अतिरिक्त पाण्याचा वापर अधिक वीज निर्मितीसाठी झाला. त्याचबरोबर धरण लवकर भरून सात स्वयंचलित दरवाजे खुले होऊन निर्माण होणारी बिकट पूर स्थिती, पीकहानी टळली. सात स्वयंचलित दरवाजे लवकर खुले झाल्यास भोगावतीतून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर नियोजनामुळे वीज निर्मितीसाठी झाला 
आहे.

गतवर्षी धरण क्षेत्रात २४२० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर धरण पूर्ण भरून स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते; मात्र यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून जलाशयात कमाल पाणी पातळी वाढ होईल, तसा विसर्ग वाढवून वीज निर्मितीसाठी पायथ्याच्या वीजगृहातून पाणी सोडण्यात येत आहे. दोन्ही जलविद्युत केंद्रांना आवश्‍यक प्रमाणात वीज निर्मितीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. धरण पायथ्याशी धरण उभारणीच्या काळात उभारलेले जुने चार, तर खासगीकरणातून उभारलेले नवीन दहा मेगावॉट क्षमतेची जनित्रे आहेत. यातून वीज निर्मितीसाठी जलाशयात आवक होणारे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठीचे उपअभियंता रोहित बांदिवडेकर यांचे प्रायोगिक विसर्ग नियोजन यशस्वी ठरले.

महानिर्मितीच्या अखत्यारितील जलविद्युत केंद्रातून २७ ऑगस्टपर्यंत ३० लाख, तर बीओटी तत्त्वावरील केंद्रातून ९० लाख युनिट इतकी वीज निर्मिती झाली आहे. जलाशय पाणी पातळीनुसार या दोन्ही केंद्रांतून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवत ४०० ते २२०० क्‍यूसेक इतके पाणी वीज निर्मितीसाठी सोडण्यात आले. यातून महसुली उत्पन्नात भर व वाया जाणाऱ्या पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याच्या वापरातून वीज निर्मिती वाढली. 

पुराची तीव्रता झाली कमी
विसर्ग नियोजनातून वीजनिर्मितीसाठी पाणीवापर सुरू ठेवल्याने धरण क्षेत्रात ३३२१ मिलिमीटर पाऊस होईपर्यंत ओव्हर फ्लो विसर्ग लांबला. त्यातून पुराची तीव्रता कमी राहिली. आणखी किमान महिनाभर तरी वीजनिर्मितीसाठी पाणी उपलब्धतेच्या शक्‍यतेने उच्चांकी वीजनिर्मिती शक्‍य आहे.

Web Title: radhanagari konkan news 1.20 crore unit electricity generation