एकमेव राधानगरी गणावर आता सर्व पक्षांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

राधानगरी - फेर आरक्षण प्रक्रियेनंतर राधानगरी पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी (पुरुष) आरक्षित झाल्याने आता पंचायत समितीच्या राधानगरी या एकमेव गणावर दोन्ही कॉंग्रेससह भाजप व अन्य पक्षांचे लक्ष केंद्रित होणार आहे. पंचायत समितीच्या दहा गणांपैकी एकमेव राधानगरी येथे हे आरक्षण आहे.

राधानगरी - फेर आरक्षण प्रक्रियेनंतर राधानगरी पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी (पुरुष) आरक्षित झाल्याने आता पंचायत समितीच्या राधानगरी या एकमेव गणावर दोन्ही कॉंग्रेससह भाजप व अन्य पक्षांचे लक्ष केंद्रित होणार आहे. पंचायत समितीच्या दहा गणांपैकी एकमेव राधानगरी येथे हे आरक्षण आहे.

भाजप-ताराराणी आघाडी वगळता तालुक्‍यात अद्याप इतर पक्षांच्या आघाड्यांची रचना झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या उमेदवारांची नावे केवळ चर्चेत आहेत. याचवेळी भाजपने तालुकाध्यक्ष दीपक शिरगावकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. दोन्ही कॉंग्रेसकडून प्रबळ व निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सद्यःस्थितीत उमेदवारीबाबत गोपनीयता राखली असून, दोन्ही पक्षांच्या संभाव्य आघाड्या अस्तित्वात आल्यानंतरच या पक्षातील उमेदवारांचे नाव पुढे येणार आहे.

सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने अनुसूचित जातीच्या एकमेव राधानगरी मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी कमालीची स्पर्धा राहणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक प्रणीत ताराराणी आघाडीने तालुक्‍यातील जास्तीत जास्त जिल्हा परिषद मतदारसंघांत उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. यातून भाजप-ताराराणी आघाडीच्या तालुक्‍याच्या राजकीय पटलावरील प्रवेशाने तालुक्‍याचे राजकारण बदलण्याचे संकेत आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस नेतृत्वाचा उमेदवार निवडीत कस लागेल. दीड दशकानंतर अनुसूचित जाती प्रवर्गातील कार्यकर्त्याला सभापतिपदाची संधी आली आहे. यामुळे दोन्ही कॉंग्रेसकडील उमेदवारांबाबत कमालीची उत्कंठा आहे. गेल्या निवडणुकीत तालुक्‍यात कॉंग्रेस व स्वाभिमानी पक्षाची लढत राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनता दल आघाडीविरोधात झाली होती. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप-ताराराणी आघाडी, अपक्ष अशी बहुरंगी लढत शक्‍य आहे. सभापतिपदाची माळ राधानगरी गणातून निवडून येणाऱ्याच्या गळ्यात पडणार आहे.

Web Title: radhanagari panchayat samitee