राधानगरी पाणलोट क्षेत्रात पावसाचा शतकातील उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद
पावसाने अखेर रविवारपासून (ता. ११) पूर्ण उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. शिवाय, मेन गेटही बंद केल्याने पूर्ण विसर्ग थांबला आहे. यामुळे भोगावती नदीचे पाणी झपाट्याने कमी होत असल्याने मार्गही आजपासून वाहतुकीसाठी खुले झाले.

राधानगरी - राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात एक ते दहा ऑगस्ट या दहा दिवसांच्या काळात झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे सात दशकांचे पावसाचा विक्रम मागे टाकला. दहा दिवसांत पडलेला पाऊस शतकातील उच्चांकी ठरला.

एक ऑगस्टपासून धरण पाणलोट क्षेत्रात २४ तास अतिवृष्टी होती. त्यापूर्वीच ३१ जुलैला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्या दिवसापर्यंत दोन हजार ७६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एक ते दहा ऑगस्ट या दहा दिवसांतच धरण क्षेत्रात तब्बल दोन हजार १९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला. धरण क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार १५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात धरण क्षेत्रात एकूण तीन हजार ९०० मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. धरण क्षेत्रात आताच गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार२५१ मिलिमीटर इतका अधिक पाऊस झाला आहे. अद्याप पावसाळा संपण्यास महिन्याभराचा अवधी आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस रेकॉर्डब्रेक ठरणार आहे.

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आतापर्यंत पाण्याचा १० टीएमसी एवढा निव्वळ विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी विनावापरच सोडावे लागले. काळम्मावाडी धरणातून केवळ दहा दिवसांत पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला. राधानगरी धरणाचे खुले असल्याने दोन स्वयंचलित दरवाजे आज सकाळी बंद झाले. आता केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी सोडलेल्या चौदाशे क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhanagari Water Area Rain Record