राजू शेट्टींविरुद्ध रघुनाथदादा पाटील लढणार 

अजित झळके
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सांगली - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधातील पहिला पैलवान ठरला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील शेट्टींनी आव्हान देत मैदानात उतरणार आहेत. त्यांनी स्वतःच तशी घोषणा केली आहे. आता भाजपकडून शेट्टींविरुद्ध कुणाला मैदानात उतरवले जाते, याची उत्सुकता असेल. 

दिवंगत माजी खासदार शरद जोशी यांच्या तालमीत तयार झालेले रघुनाथदादा पाटील यांचा शेतकऱ्यासाठीचा लढा सुरुच आहे. त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांवर तोफ डागली. त्यावेळी "बाहेरून केलेले आरोप सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहचतील का? आत जावून आवाज उठवला पाहिजे, असे वाटते का?' या पत्रकारांच्या प्रश्‍नावर रघुनाथदादांनी लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले. "

मी लोकसभेलाच लढणार आहे. सांगली नव्हे तर हातकणंगले या माझ्या घरच्या मैदानातून उतरेन', असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी दूध आंदोलनात शेतकऱ्यांचे नुकसानच झाल्याची टीका त्यांनी शेट्टींवर केली. 

कुणी म्हणेल की दरवेळी ह्यांचा नवा पक्ष असतो. कुठलाच पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्‍न लक्षात घ्यायला तयार नाही, हे देशाचे दुखणे आहे. शेतीमालाला भाव मिळाल्याशिवाय देशाची प्रगती होत नाही. कॉंग्रेसची जी भूमिका तीच आहे, तीच मोदींची आहे. याविरुद्ध लढत रहावे लागेल, रस्त्यावरही आणि निवडणूकीतही.

- रघुनाथदादा पाटील 

सन 2009 ला रघुनाथदादांनी शेट्टींविरुद्ध लढत दिली. ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले होते. सन 2014 ला ते पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरले. त्यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झाली होती. त्याहीआधी त्यांनी दोनवेळा वाळवा विधानसभा मतदार संघातून विधानसभेला जयंत पाटील यांना आव्हान दिले होते. यावेळी पुन्हा एकदा ते लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. शेट्टींनी सध्या भाजपविरोधात भूमिका घेतली आहे, मात्र ते विरोधी पक्षांसोबत जाणार की स्वतंत्रपणे शड्डू ठोकणार हे स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे भाजप शेट्टींविरुद्ध ताकदीचा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्याविषयी उत्सुकता आहे. 
 
Web Title: Raghunathdada Patil against Raju Shetty in Lok Sabha elections