esakal | ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackreay Top Stories In Marathi News

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल
sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.
 
राहुल हाेता कट्टर शिवसैनिक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.
 
ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल...

पोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. 


कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी


दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला. 


अश्रूंना मिळाली मोकळी वाट 

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला.