शेतात पाच तास लपून पकडले वाळूचे पाच डंपर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

राहुरी - तालुक्‍यातील आरडगाव येथे मुळा नदीतून बेकायदा वाळूउपसा करणारी पाच वाहने तहसीलदार अनिल दौंडे यांनी आज पहाटे पकडली. ही कारवाई करण्यापूर्वी पाच तास ते उसाच्या शेतात थांबले होते. तालुक्‍याच्या पूर्व भागातील तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव परिसरात मुळा नदीतून वाळूचा बेसुमार उपसा होत आहे. कारवाई करण्यासाठी तलाठी एस. ए. पाडळकर व अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेत दौंडे दुचाकीवरून केंदळ बुद्रुक येथील पुलापासून नदीपात्रात रात्री अकरा वाजता पोचले. तेथून शिलेगाव-आरडगाव नदीपात्रालगत असलेल्या उसाच्या शेतात लपून बसले. शेतात सुमारे पाच तास थांबल्यानंतर ते पहाटे साडेचारच्या सुमारास नदीत उतरले. त्याच वेळी वाळू भरण्यासाठी आलेले पाच डंपर दौंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले. यादरम्यान वाळूचोर व मजुरांनी धूम ठोकली. दौंडे यांनी महिन्यापूर्वीच तांदूळवाडी व कोंढवडदरम्यान अशीच कारवाई केली होती. त्या वेळी ते नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये तीन तास लपून राहिले होते. तेव्हा त्यांनी पाच वाहने पकडली होती.
Web Title: rahuri nagar news five sand dumper seized