नगरचे चौघे तरुण धबधब्याच्या पाण्यात बुडाले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

एक जण बचावला; शोधकार्यात पावसाचा अडथळा

एक जण बचावला; शोधकार्यात पावसाचा अडथळा
राहुरी - वांबोरी-नगर रस्त्यावरील डोंगरगण घाटातील पानदरी धबधबा पाहण्यासाठी गेलेले नगरचे चार तरुण पाण्यात बुडाले. खोल खड्ड्यात ते बुडाल्याने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. युवराज हरिभाऊ साळुंके (वय 21), शुभम अशोक मोरे (वय 19), श्रीराम प्रभाकर रेड्डी (वय 20, तिघे रा. केडगाव) आणि गणेश पोपट वराळ (वय 20, रा. माळीवाडा) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेला प्रतीक दौलत गायकवाड (वय 21) हा बचावला आहे. मात्र, त्याला बसलेल्या धक्‍क्‍यातून तो सावरलेला नाही.

हे पाचही तरुण घाटापासून दीड किलोमीटर आत असलेल्या जंगलातील पानदरी धबधबा येथे गेले होते. धबधब्याच्या खाली खोल खड्डा आहे. धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत असताना दोघांचा पाय घसरून ते खड्ड्यातील पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी अन्य दोघांनी खड्ड्यात उडी मारली. खड्ड्यात चौघेही बुडाल्याचे पाहून त्यांच्यासमवेत असलेला प्रतीकला धक्का बसल्याने धबधब्याखाली तसाच बसून होता. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्यांचे मृतदेह सापडले नव्हते. जंगलात हे ठिकाण असल्याने अंधार आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तेथे धाव घेतली.

Web Title: rahuri nagar news four drawn in waterfall