आमदार मुश्रीफ यांच्यावरील छाप्यामुळे कोल्हापुरात खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

कोल्हापूर - कोल्हापूरच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे बडे नेते असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज प्राप्तीकर विभागाचा छापा पडल्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. श्री. मुश्रीफ यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर नाकारल्यानंतर आठ दिवसांतच झालेल्या या कारवाईने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

कोल्हापूर - कोल्हापूरच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे बडे नेते असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज प्राप्तीकर विभागाचा छापा पडल्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. श्री. मुश्रीफ यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर नाकारल्यानंतर आठ दिवसांतच झालेल्या या कारवाईने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही पश्‍चिम महाराष्ट्राकडेच आहे आणि या पदावर वाळव्याचे आमदार जयंत पाटील कार्यरत आहेत, तर श्री. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे अतिशय विश्‍वासू आणि खंदे समर्थक अशी या दोघांची ओळख आहे. काहीही झाले तरी हे दोघेही राष्ट्रवादी सोडणार नाहीत, हेही निश्‍चित आहे. त्यात जयंत पाटील यांनी अलिकडेच महसूल मंत्री व भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलाच एक जमीन घोटाळा अधिवेशनात काढला. त्यानंतर काही दिवसांतच श्री. मुश्रीफ यांनी भाजपमध्ये प्रवेश नकार दिला. 

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पहिलाच कार्यक्रम श्री. मुश्रीफ यांच्या मतदार संघातील गडहिंग्लज येथे झाला. या कार्यक्रमाला श्री. मुश्रीफ हेही निमंत्रित होते, या कार्यक्रमात श्री. पाटील यांनी श्री. मुश्रीफ यांना थेट भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण देताना त्यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. श्री. मुश्रीफ हे अनुभवी आहेत, त्यांचे काम चांगले आहे, त्यांच्यासारख्या माणसाची भाजपला गरज आहे. या शब्दात श्री. पाटील यांनी त्यांचे कौतुक करत भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. पण त्याचदिवशी श्री. मुश्रीफ यांनी हे निमंत्रण फेटाळून लावताना श्री. पवार हेच माझे दैवत असल्याचे सांगत राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे संकेत दिले. त्यानंतर काही दिवसांतच प्राप्तीकर विभागाची ही कारवाई झाल्याने यामागे श्री. मुश्रीफ यांनी भाजपमध्ये प्रवेश नाकारला हे कारण तर नसेल ना ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपमध्ये किंवा शिवसेना नेते व मंत्र्यांना टोकाचा विरोध करणाऱ्यांत श्री. मुश्रीफ आघाडीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून संधी मिळेल तिथे श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर टिका केली आहे. नागणवाडी व आंबेओहोळ प्रकल्पाच्या निधी वाटपात श्री. मुश्रीफ यांना प्रशासनाने डावलल्यानंतर श्री. पाटील यांनीच त्यांना फोनवरून निमंत्रण देत त्या कार्यक्रमाला आलेच पाहीजे असा आग्रह केला. त्यामुळे श्री. मुश्रीफ त्या कार्यक्रमाला गेले. अशा अनेक घटना श्री. मुश्रीफ व श्री. पाटील यांच्या बाबतीत घडल्या आहेत. पण भाजपमध्ये विरोधक अशीच ओळख श्री. मुश्रीफ यांची आतापर्यंत राहीली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on MLA Musharraf special story