सराफ व्यावसायिकांवर छापे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील नामवंत सराफ व्यावसायिकांच्या पाच दुकानांवर आज सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर पडलेल्या या छाप्यांमुळे सराफ बाजारात खळबळ उडाली. दिवसभर प्राप्तिकर खात्याचे अधिकारी या व्यावसायिकांकडे माहिती घेत होते. दरम्यान, कोल्हापूर सराफ संघाने या छाप्यानंतर तातडीने बैठक घेऊन मंगळवारपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र दोन तासांतच तो मागे घेण्यात आला.

कोल्हापूर - कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील नामवंत सराफ व्यावसायिकांच्या पाच दुकानांवर आज सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर पडलेल्या या छाप्यांमुळे सराफ बाजारात खळबळ उडाली. दिवसभर प्राप्तिकर खात्याचे अधिकारी या व्यावसायिकांकडे माहिती घेत होते. दरम्यान, कोल्हापूर सराफ संघाने या छाप्यानंतर तातडीने बैठक घेऊन मंगळवारपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र दोन तासांतच तो मागे घेण्यात आला. नोटा रद्द झाल्यानंतर सराफ व्यावसायिकांकडे काही मोठे व्यवहार झाले का, हे तपासण्यासाठी हे छापे टाकल्याचे सांगण्यात आले. 

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून पाचशे व हजाराच्या नोटा बाजारातून मागे घेतल्या. त्यानंतर काळा पैसा बाळगलेल्यांनी सराफ व्यावसायिकांकडून जुन्या नोटा देऊन मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली. जुन्या नोटांचा व्यवहार करताना चढ्या दराने सोने विकले जात असल्याचीही चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी व इचलकरंजी येथील महेंद्र ज्वेलर्सच्या दुकानावर छापे टाकले. राजारामपुरी येथील कारेकर यांच्या दुकानावरही छापा टाकल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. महेंद्र ज्वेलर्सची दुकाने आज दिवसभर बंदच राहिली. अधिकाऱ्यांनी सीसी टीव्हीचे चित्रीकरण तसेच संगणकाच्या हार्डडिस्कची मागणी केल्याचे समजते. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने झाली. छाप्याची बातमी सोशल मीडियावरून पसरल्याने सराफ बाजारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांकडे चौकशी केली जाऊ लागली. काहींनी आपले व्यवहार बंद ठेवले. 

शहरातील नामवंत सराफ प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्याने कोल्हापूर सराफ संघाने तातडीने आपल्या सभासदांना निरोप पाठवून दुपारी दीडच्या सुमारास बैठक बोलावली. छाप्याच्या पार्श्‍वभूमीवर बैठक बोलावल्याने त्यावर मतभेद झाले. त्यामुळे काही जण बैठकीलाच गैरहजर राहिले. नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर सराफ बाजारात जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्याची अफवा पसरवली जात आहे, त्यामुळे व्यावसायिकांची बदनामी होत आहे. त्याच्या निषेधार्थ तसेच बाजारात नवे चलन अद्याप पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने मंगळवारपर्यंत सराफ व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसा निरोपही सर्वांना देण्यात आला; मात्र अवघ्या दोनच तासांत कोल्हापूर सराफ संघ व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने बंदचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे काही काळ बंद असलेली दुकाने सुरू करण्यात आली. 

केंद्र शासनाने घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयाचे बैठकीत स्वागत करण्यात आले. बंदचा निर्णय कायम ठेवल्यास ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. शिवाय प्राप्तिकर विभागाकडून केवळ 8 नोव्हेंबरच्या निर्णयानंतर झालेल्या व्यवहारांची पडताळणी केली जात असल्याचे महेंद्र ज्वेलर्सचे ओसवाल यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. 

सोळा जणांच्या चार पथकांकडून चौकशी 

स्थानिक प्राप्तिकर विभागाच्या 16 जणांचा समावेश असलेल्या चार पथकांनी भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, इचलकरंजी येथील सराफ व्यावसायिकांवर छापे घातले. या कारवाईची चर्चा दिवसभर सुरू होती. अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांकडे उपलब्ध सोने-चांदीचा साठा, वर्षभरातील आर्थिक व्यवहारासह कागदपत्रे दिवसभर तपासण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: raids on jewellers business