रेल्वेचे बुकिंग आता एका शिफ्टमध्ये!

पांडुरंग बर्गे
सोमवार, 15 जुलै 2019

सातारा रेल्वे स्थानकातील दोन शिफ्टपैकी एक बंद करून एका शिफ्टमध्ये बुकिंग सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आहे. आम्ही एका शिफ्टमध्ये प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.
- मनिराम मीना, स्थानक प्रमुख, सातारा रेल्वे स्थानक

कोरेगाव - सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (१६ तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.

सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री आठ असे दोन शिफ्टमध्ये रेल्वे तिकीट बुकिंग सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अचानक रेल्वे तिकीट बुकिंग दोनऐवजी एका शिफ्टमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन यावेळेत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. 

सातारा व कऱ्हाड ही दोन्ही रेल्वे स्थानके शहरांपासून खूप लांब आहेत. कऱ्हाड रेल्वे स्थानक हे शहरापासून पाच किलोमीटर, तर सातारा रेल्वे स्थानक हे शहरापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. सातारा स्थानकात शहरासह प्रामुख्याने कोरेगाव, खटाव, माण, तर कऱ्हाड स्थानकात शहर, उपनगरांसह पाटण, वाळवा तालुक्‍यातील प्रवाशांची ये- जा असते. दोन्ही स्थानकांत दोन्ही शहरांसह तालुक्‍यातील व्यापारी, औद्योगिक वसाहतीमधील छोटे- मोठे उद्योगपती, शासकीय, निमशासकीय, खासगी विभागातील अधिकारी, कर्मचारी, पर्यटक, तिर्थक्षेत्री जाणारे भाविक, आजी- माजी सैनिक, नागरीक, कामगार आपल्या सवडीनुसार कार्यालयाचे कामकाज, इतर सर्व कामकाज आटोपून बुकिंगसाठी येतात. या सर्वांना दोन्ही स्थानकांमधील दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले रेल्वे तिकीट बुकिंग सोईस्कर होते. मात्र, अचानक दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले बुकींग एका शिफ्टमध्ये सुरू केल्यामुळे सर्वच प्रवाशांची प्रचंड गैरसोय सुरू झाली आहे.  

दोन शिफ्टऐवजी एका शिफ्टमध्ये बुकिंग सुरू केल्याबाबत रेल्वेच्या एका अधिकृत सूत्रांनी सांगितले, की दोन्ही स्थानकांत दोन शिफ्ट असूनही बुकिंग मात्र, समाधानकार नाही. एका शिफ्टमध्ये दररोजचे बुकिंग किमान दीडशे ते अडीचशेपर्यंत असायला हवे मात्र, तसे होताना दिसत नाही. या दोन शिफ्ट सुरू ठेवल्यामुळे रेल्वेचे फायद्यापेक्षा नुकसान अधिक होत असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकच बुकिंग शिफ्ट सुरू करण्यात आलेली आहे.  

सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत दोनऐवजी एका शिफ्टमध्ये बुकिंग सुरू केल्यामुळे सर्व स्तरांतील प्रवाशांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्‍त होताना दिसत आहे. प्रवाशांमधून पूर्वीप्रमाणे दोन शिफ्टमध्ये बुकिंग सुरू करण्याची मागणी होत असून, प्रसंगी प्रवाशी रेल रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य बाबूराव काटकर यांनी दिली.

सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत दोन शिफ्टऐवजी एकच शिफ्ट सुरू केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या आग्रही मागणीनुसार दोन्ही स्थानकांत पूर्वीप्रमाणे दोन शिफ्टमध्ये बुकिंग सुरू करण्याची मागणी आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
- बाबूराव काटकर, सदस्य, पुणे विभागीय सल्लागार समिती, मध्य रेल्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Booking in one shift