कागल तालुक्यात भूस्खलनचा धोका, 16 घरांना तडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पागम गल्ली व मंदिर परिसरातील घरातून पाण्याचे नालेच वाहत आहेत. त्यामुळे घरात दलदल आणि कोणत्याही क्षणी कोसळतील अशा भिंती असणारी 25 हून अधिक घरे आहेत. येथे काहींनी मोठे नळ घालून पाणी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद सदस्या सौ. शिल्पा खोत, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, शशिकांत खोत यांनी येथे भेट देऊन पाहणी केली.

सेनापती कापशी : यापूर्वी कधीही पाहिला नाही असा पाऊस झाल्याने रस्ते, पूल, घरे, जनावरे असे प्रचंड नुकसान झाले. कागल तालुक्यातील सर्वात उंच व डोंगर रांगात असलेल्या बोळावी गावाला मात्र वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. येथे वास्कर गल्लीत 200 मीटर लांबीची डोंगराला समांतर अशी भेग पडली आहे. त्यामुळे 16 घरांना भेगा पडल्या आहेत तर गावातील 20 हुन अधिक घराच्या भिंतीतून नाल्यासारखे पाणी वाहत आहे. येथे भूस्खलनाचा धोका व्यक्त होत असताना वाहतूक बंद असल्याने कर्मचारी येऊ शकत नाहीत, अशी कारणे सांगून प्रशासनाचे कोणी फिरकले नाही. नागरिक भीतीच्या छायेत आहेत. 

येथील वास्कर गल्लीत सुमारे 200 मीटर लांबीची आणि चार इंच रूंदीची जमिनीला भेग पडली आहे. यामुळे या गल्लीतील 16 घराना तडे गेले आहेत. दोन दिवसात ही जमिनीतील भेग वाढल्याचे नागरिक सांगत आहेत. काही घरे कलल्याने ती कोणत्याही क्षणी कोसळतील अशी स्थिती आहे. पण सर्वानीच घरे सोडून जायचे कोठे? हा लोकांसमोर प्रश्न आहे. गावातील आठ ते दहा घरांची पडझड झाली आहे. ते आणि घरात पाणी आलेले लोक मंदिरात राहत आहेत. 

पागम गल्ली व मंदिर परिसरातील घरातून पाण्याचे नालेच वाहत आहेत. त्यामुळे घरात दलदल आणि कोणत्याही क्षणी कोसळतील अशा भिंती असणारी 25 हून अधिक घरे आहेत. येथे काहींनी मोठे नळ घालून पाणी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद सदस्या सौ. शिल्पा खोत, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, शशिकांत खोत यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. वीज नसल्याने मेणबत्त्या पुरवल्या. भूस्खलनाचे गांभीर्य प्रशासनाला कळविले. स्थलांतर झालेल्या कुटुंबातील लोकांची कापशी आरोग्य केंद्राच्या डॉ. विवेक गावडे, एस. आर. पाटील यांच्या पथकाने आरोग्य तपासणी सुरू ठेवली आहे. 

हसूर बुद्रुक येथे 20 घरांची पडझड झाली आहे. सरपंच दिग्विजय पाटील, मनोज वास्कर, सूर्यकांत शिंदे यांनी पाहणी करून प्रशासनाला कळवले आहे.  हळदवडे, करंजीवणे, हळदी येथे गेले पाच दिवस वीजपुरवठा नसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले. येथे शशिकांत खोत यांनी लोकांना मेणबत्त्या पुरविल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain affected homes in Kagal tehsil Kolhapur