पावसापुढे महापालिका हतबल : नाले वळवले; मारुती चौकासह शहर, उपनगरे जलमय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

सांगली - चार दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे निम्मी सांगली जलमय झाली आहे. स्टेशन चौक, राजवाडा, मारुती चौक, झुलेलाल चौकात पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. कसरत करीत रस्ते पार करावे लागत आहेत. पालिकेची आपत्ती व्यवस्था यंत्रणा कागदी घोडे नाचवत आहे. दरम्यान, कृष्णेच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता आयर्विन पुलाजवळ ती ३३ फूट होती. दत्तनगर, सूर्यवंशी प्लॅटमध्ये पाणी घुसले आहे. पंधरा कुटुंबांना स्थलांतरित केले आहे.

सांगली - चार दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे निम्मी सांगली जलमय झाली आहे. स्टेशन चौक, राजवाडा, मारुती चौक, झुलेलाल चौकात पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. कसरत करीत रस्ते पार करावे लागत आहेत. पालिकेची आपत्ती व्यवस्था यंत्रणा कागदी घोडे नाचवत आहे. दरम्यान, कृष्णेच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता आयर्विन पुलाजवळ ती ३३ फूट होती. दत्तनगर, सूर्यवंशी प्लॅटमध्ये पाणी घुसले आहे. पंधरा कुटुंबांना स्थलांतरित केले आहे.

पावसाने दाणादाण उडाली आहे. स्टेशन चौकात पावसातच ड्रेनेजचे काम करण्याचा घाट पालिकेकडून घातला होता. तिथे तब्बल पाच फूट पाणी साचले आहे. पदपथ पाण्याखाली गेलेत. राजवाडा चौकातही पाण्याचे डबके झाले आहे. मारुती चौक, आनंद चित्रमंदिर परिसरात दहा फूट पाणी साचून आहे. पंधराहून अधिक दुकानांत पाणी शिरले आहे. व्यापाऱ्यांची कसरत सुरू होती. बसस्थानक परिसर, हरिपूर रोड, कोल्हापूर रस्ता, शंभरफुटी भागातील ठिकठिकाणी पाण्याची तळी झालीत. विश्रामबागसह विस्तारित भागातही सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली. राजर्षी शाहू महाराज नवीन वसाहत, मीरा हौसिंग सोसायटी, जासूस मळा भागात घराघरांत पाणी शिरले आहे.

दुसऱ्या बाजूला गुंठेवारीसह झोपडपट्टी आणि विस्तारित भागाची पार दैना उडाली. इंदिरानगर झोपडपट्टीत नाला तुंबला आहे. शामरावनगरचा भाग चिखलात रुतला आहे. दत्त कॉलनी, अभिनव प्राथमिक शाळेला पाण्याचा वेढा पडला आहे. चारही बाजूने पाण्याने वेढल्याने शामरावनगर बेट बनले आहे. गुंठेवारीत दलालांनी कमाई केली, पण तेथे घरे बांधणाऱ्यांवर नरकयातना भोगण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, पालिकेकडून पाणी निचऱ्यासाठी कोणतेही नियोजन वा ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सकाळी शामरावनगरला भेट दिली. नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर दोन जेसीबीच्या सहाय्याने पाण्याच्या निचऱ्यासाठी पर्यायी चरी काढण्याचे काम सुरू झाले. भविष्यातील आपत्तीसाठी कोणत्याही उपायायोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक पालिकेच्या नावाने बोटे मोडत आहेत.

नाले वळवल्याचा परिणाम भयंकर
शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. नाले वळवून बेकायदेशीर बांधकामे केली गेली गेली आहे. काही ठिकाणी चक्क नाल्यांवर घरे बांधली आहेत. सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था कोलमडली आहे. पालिकेला आपलाच कारभार अंगलट आला आहे. सांगलीत २००५ च्या महापुरानंतर प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही पुरामुळे नाही, तर पालिकेच्या दुर्लक्षामुळे झाली आहे.

रस्ते उखडले
पावसाळापूर्व नियोजनात यंदा पॅचवर्कची कामे झालीच नाही. पालिकेमुळे सारे रस्ते उखडलेल्या स्थितीत आहेत. शहरभर डबकी साचलीत. पालिकेच्या दारातच फूटभर पाणी आहे. तरीही अधिकाऱ्यांना जाग येत नाही. ते शहरवासीयांची दैना पाहताहेत.

शामरावनगरला नरकयातना
शामरावनगरसह अन्य गुंठेवारीतील नागरिक नरकयातना भोगत आहेत. मूलभूत सुविधाही या भागाला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ही स्थिती आली आहे. नागरिकांनी थेट लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

क्षणचित्रे...
मारुती रस्त्यावरील पंधरा दुकाने पाण्यात
सूर्यवंशी प्लॅटमधील १५ कुटुंबांचे स्थलांतर
स्टेशन चौक, राजवाडा परिसरात पूरसदृश स्थिती
माईघाटवर पाणी ; बघ्यांची गर्दी
बोटिंग क्‍लब पाण्यात
शामरावनगरसह गुंठेवारीत चिखल
पूरपट्ट्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाणी वाढले तर काय होईल? (पूरपातळी व ठिकाण)
३२ फूट-कर्नाळ रस्ता
३४ फूट-काकानगरसमोरील घरे
३५ फूट-दत्तनगर परिसर
३९ फूट-मगरमच्छ कॉलनी पहिली गल्ली
४० फूट-मगरमच्छ कॉलनी दुसरी गल्ली
४२ फूट-मगरमच्छ कॉलनी तिसरी गल्ली, मगरमच्छ कॉलनी, जुना बुधगाव रस्ता
४३ फूट-सिद्धार्थनगर परिसर, राजीव गंधीनगर, ईदगाह मैदान
४८.६ फूट-टिळक चौक, शिवाजी मंडई, जामवाडी, कोल्हापूर रस्ता, सांगलीवाडी
४५.९ फूट-हरिपूर रोड, मारुती चौक
४४.५ फूट-भारतनगर, पाटणे प्लॉट
५०.६ फूट-खिलारेनगर, शामरावनगर, महसूल कॉलनी रिसाला रोड  
(सांगलीत यापूर्वी २००५ ते २००६ या काळात पुराने हाहाकार माजवला होता)

पूरपट्ट्यात घरांना विळखा; १५ कुटुंबांचे स्थलांतर
शेरीनाल्याचे पाणी फुगू लागल्यामुळे जामवाडीजवळील पूरपट्टयातील सूर्यवंशी प्लॉटला पाण्याने वेढा दिला आहे. १५ कुटुंबानी स्थलांतर केले आहे. सायंकाळी कर्नाळ रस्त्यावरील शेरीनाल्याच्या पुलाला पाणी स्पर्श करीत होते. जुना बुधगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिरजवळील रस्ता चार फुटांहून अधिक पाण्याखाली गेला. बायपास रस्त्यावरील व्यंकटेश सृष्टी परिसर, मल्टिप्लेक्‍सच्या मागील परिसर पुन्हा पाण्याखाली गेला आहे. पूरपट्टयात नेहमीप्रमाणे काल रात्रीच सूर्यवंशी प्लॉटमधील सात ते आठ घरांत पाणी शिरले. महापालिकेच्या वतीने सूर्यवंशी प्लॉट आणि दत्तनगर सात कुटुंबांचे स्थलांतर शाळा नं. एकमध्ये करण्यात आले. तर पाच कुटुंबानी स्वत:हून सुरक्षितपणे स्थलांतर केले. दुपारपर्यंत १२ कुटुंबांचे स्थलांतर पूर्ण झाले. कृष्णेत मिसळणाऱ्या शेरीनाल्याच्या पाण्याला फुग येऊ लागली. सायंकाळी पाचच्या सुमारास शेरीनाल्यावरील पुलाला पाणी स्पर्श करीत होते. नाल्यातील पाणी बाहेर पडल्यामुळे जुना बुधगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराभोवती चार फुटांपर्यंत पाणी वाढून रस्ताच बंद झाला. मल्टिप्लेक्‍समागील परिसर पाण्याने वेढला गेला. भोवतीचा परिसरही ‘बॅक वॉटर’ने व्यापला आहे. नाल्याची पातळी वाढल्यामुळे टिंबर एरियाजवळील झोपडपट्टीतही पाणी शिरले. पाणी अस्ताव्यस्त पसरत आहे.

पूरपट्ट्यात धोका
२००५ आणि २००६ च्या पुरानंतर गेली काही वर्षे कृष्णेला पूर आला नव्हता. परिणामी पुराची भीती नसल्यामुळेच की काय पूरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडून बांधकामे झाली आहेत. त्यावर ना प्रशासनाने ना शासनाने कारवाई केली. परंतु पुरापूर्वीच शेरीनाल्याच्या ‘बॅक वॉटर’ मुळे पूरपट्टा पाण्याने वेढा गेला. भल्यामोठ्या इमारतीभोवती पाण्याचा गराडा पाहून बांधकामे आणि त्यांना दिला गेलेला परवाना चर्चेत आला आहे. प्लॉट पाडून मुरूम टाकल्यामुळे व बांधकामाच्या भरीमुळे पूरपट्टा आणि शेजारील परिसराला पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे.

‘सकाळ’ सांगली वॉट्‌स ॲप - ९१४६०९५५००
आपल्या परिसरातील समस्यांची माहिती छायाचित्रांसह या क्रमांकावर पाठवा. तो प्रश्‍न सोडवण्यासाठी आपल्याला माहित असलेला पर्याय व खात्रीशीर उपायही सांगा. ‘सकाळ’ त्याला प्रसिद्धी देईल. प्रश्‍न सुटण्यासाठी सकाळ तुमच्यासोबत असेल.

आपत्कालीन मदतीसाठी... -  सांगली - (०२३३) २३२५६१२/१०१ r  मिरज -  (०२३३) २२२२६१०/१०१ -  अग्निशमन दल -  सांगली - के. जी. सागावकर - ९९२२४१६०३८ -  मिरज - चिंतामणी कांबळे - ९४२२४१६००६

Web Title: rain e Municipal too: turning sewage; Maruti caukasaha city, suburb flood