पावणेदोनशे कुटुंबे उघड्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

अशी आहे बाधित घरांची स्थिती 
पूर्ण पडलेल्या कच्च्या घरांची संख्या - कऱ्हाड १५, महाबळेश्वर सात, जावळी पाच, पाटण ९५. 
पक्‍क्‍या घरांची संख्या - जावळी एक, सातारा १४, पाटण ३७. 
अर्धवट पडलेल्या कच्च्या घरांची संख्या - कऱ्हाड ३५२, वाई ३३, महाबळेश्वर ११६, जावळी २९५, सातारा ६९, खंडाळा तीन, कोरेगाव, १५८, पाटण ९३५.
अधर्वट पडलेल्या पक्‍क्‍या घरांची संख्या - वाई नऊ, जावळी चार, सातारा १३३, कोरेगाव तीन, 
पाटण १८.
अंशतः बाधित घरांची संख्या - सातारा ५६९, जावळी २२७, कऱ्हाड ४५०, पाटण ९८६, वाई ३००, महाबळेश्‍वर ७१, खंडाळा २८२ फलटण पाच.
वाई, कोरेगाव, पाटण तालुक्‍यांतील ७३ झोपड्या बाधित झाल्या.

जिल्ह्यात महापुराचा २८९५ घरांना दणका; पाच तालुक्‍यांतील दहा हजार ७५५ नागरिक विस्थापित
सातारा/कऱ्हाड - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश स्थितीमुळे कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्‍यांतील पावणेदोनशे कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील दोन हजार ८९५ घरांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. त्यात पावणेदोनशे कच्ची घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर कालावधीत विस्थापित केलेल्या कुटुंबांची संख्या १२३ असून, पूर्णत: बाधित कुटुंबांची संख्या दोन हजार ४८० आहे, तर एकूण दहा हजार ७५५ नागरिकांना विस्थापित करण्यात आले होते, तसेच कऱ्हाड तालुक्‍यातील २१०० कोंबड्या पुरामुळे मृत झाल्या आहेत. मोठी १५ आणि लहान सात जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या फटक्‍यात उद्‌ध्वस्त झालेल्यांचे संसार नव्याने उभारण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यात पूरसदृश्‍य स्थिती निर्माण होऊन अनेक गावांत पाणी घुसले. अनेक घरांत पाणी घुसल्याने कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत तर गावेच्या गावे स्थलांतरित करावी लागली. आठवडाभर निसर्गाचे हे रौद्ररूप सुरूच होते. त्यामुळे अनेक दिवस जुनी मातीची, कुडामेडाची आणि चांगली घरेही पाण्यात राहिली. त्यामुळे त्या घरांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घरे डोळ्यादेखत कोसळत आहेत.

अनेक जुन्या मातीच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान होत आहे, तर अनेकांची घरे कधी कोसळतील याचा नेमच राहिलेला नाही. पूरग्रस्त गावात रोज दोन- चार घरे कोसळत आहेत. त्यामुळे मातीच्या घरात राहूच शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीच स्थिती कुडामेडांच्याही घरांची झाली आहे. काही गावांत तर पत्र्यासकट छत वाहून गेले आहेत. त्यामुळे तेथील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ते निवारा शोधत आहेत. काहींनी तर सामाजिक सभागृह, मंदिरात आसरा घेतला आहे. ती घरे उभी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

समाजातील दानशूरांना साद 
महापुराने बाधित झालेल्या घरांच्या पडझडीचे व पूर्णतः नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याचे काम सध्या गावोगावी सुरू आहे. त्यात बाधित घरांची संख्या वाढणार आहे. संबंधित घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तो खर्च करायचा कोठून हा प्रश्न सध्या पूरग्रस्तांसमोर आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत घर उभारता येत नाही हे सर्वज्ञात आहे.

मात्र, त्या तुलनेत खर्च लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांना संबंधित पूरग्रस्तांना घर उभारणीत मदत करण्यासाठी ही एक सादच आहे. पूर कालावधीमध्ये विस्थापित केलेल्या कुटुंबांची संख्या १२३ असून, पूर्ण बाधित कुटुंबांची संख्या दोन हजार ४८० आहे, तर एकुण दहा हजार ७५५ नागरिकांना विस्थापित करण्यात आले होते, तसेच कऱ्हाड तालुक्‍यातील २१०० कोंबड्या पुरामुळे मृत झाल्या आहेत. मोठी १५ आणि लहान सात जनावरांचा मृत्य झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Flood Affected Home Collapse Family Disturb Help