पावसाने शहर गारठले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

कोल्हापूर - पावसाळ्यात यंदा प्रथमच शहरात आज दमदार पावसाची बरसात झाली. बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दिवसभर पाऊस असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. 

कोल्हापूर - पावसाळ्यात यंदा प्रथमच शहरात आज दमदार पावसाची बरसात झाली. बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दिवसभर पाऊस असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. 

पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे शहरात पावसाळी वातावरणही निर्माण झाले होते. शहराच्या उपनगरातील ओढे-नाले वाहू लागले असले तरीही पावसाची संततधार शहरात अद्याप नव्हती. मात्र आज पावसाने क्षणाचीही विश्रांती न घेता दिवसभर हजेरी लावली. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदी पातळीत वाढ झाली. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत आले होते. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. परीख पूल, फोर्ड कॉर्नर, राजारामपूरी जनता बझार, कावळा नाका, शाहुपूरी पोलिस ठाणे, शिवाजी स्टेडियमसमोर पाणी साचले होते. त्यामुळे येथून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांची कसरत होत होती.  सकाळी रेनकोट घालून शाळेला जाणारे विद्यार्थी आणि त्यांना सोडण्यासाठी छत्री घेऊन निघालेले पालक असे चित्र होते. पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यावर दुचाकींची संख्याही नेहमीपेक्षा कमी होती. फेरीवाले आणि भाजी मंडई मधील विक्रेत्यांची पावसामुळे धांदल उडाली. नेहमी संध्याकाळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी गजबजणारा महाद्वार रोडवर आज मात्र तुरळक गर्दीच होती. शहरासह उपनगरातही पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे उपनगरातील ओढे, नाले भरून वाहू लागले. काही ठिकाणी झाड पडण्याच्या किकोळ घटना घडल्या मात्र यात कोणतेही हानी झालेली नाही. 

वाहनधारकांची कसरत
शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक दिसत आहे. यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत. सतत पडणारा पाऊस आणि त्यात खड्डे यामुळे कसरत करतच वाहन चालवावे लागते.

बालचमूंनी लुटला आनंद
शाळांच्या परिसरात मुले पावसात खेळताना दिसत होती; तसेच शहरातील काही बागांमध्ये पाणी साठले होते. तेथे पावसात भिजण्याची मजा घेताना मुले दिसत होत्या. संध्याकाळी रंकाळ्यावरही पावसाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: rain in kolhapur